जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पारोळा शहरात दर सोमवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने आज पारोळा शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला पारोळा हे जनता कर्फ्यू पाळणारे जिल्ह्यातील पहिले शहर ठरले आहे.
नागरिकांनी दिला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद -
गेल्या आठवड्यापासून जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन आठवड्यातील दर सोमवारी जनता कर्फ्यू पाळून कोरोना ची साखळी खंडित करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्याधिकारी ज्योती बघत आणि नगराध्यक्ष करण पवार यांनी केलेल्या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सोमवारी शहरात जनता कर्फ्यू पाळण्यात आला.
पारोळा शहरवासीयांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद -
सकाळ सत्रात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला त्यानंतर सायंकाळी मात्र नागरिक बाहेर पडताना दिसून आले. जनता कर्फ्यू मुळे सोमवारी पारोळा शहरातील सर्वच व्यापारी प्रतिष्ठाने दुकाने तसेच इतर व्यवहार बंद होते. कोरोना ची साखळी तोडण्यासाठी पारोळा शहरवासीयांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरात सर्वत्र शुकशुकाट -
बाजारपेठेतील सर्व लहान मोठे दुकानदार व्यापारी, भाजीपाला विक्रेत्यांनी व महामार्ग लगत असलेली सर्व हॉटेल रेस्टॉरंट, गॅरेज दुकान, सलून दुकाने, फळविक्रेते यांनी दुकाने बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य केले. अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल, दूध केंद्र एवढीच दुकाने या बंदमधून वगळण्यात आली होती. मुख्य बाजारपेठ, महामार्ग वरील सर्व दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.