जळगाव - शहरातील न्यू बी. जे. मार्केटमध्ये असलेल्या एका प्रिंटींगच्या दुकानाला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, दुकान मालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी दाखल झाले नाही. त्यामुळे घटनेची पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.
जुने जळगाव परिसरातील बदाम गल्लीतील दीपक शालिक मराठे यांचे न्यू बी. जे. मार्केटमध्ये साई प्रिंटर्स नावाचे प्रिंटींगचे दुकान आहे. संचारबंदीमुळे गेल्या महिन्याभरापासून या मार्केटमधील सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे मराठे यांचेही दुकान बंद आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या दुकानात अचानक आग लागल्याने संपूर्ण मार्केटमध्ये धुराचे लोळ उठत होते. हा प्रकार मार्केटच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पंकज पाटील यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ खालच्या मजल्यावर येऊन बघितले असता, त्यांना प्रिंटींगच्या दुकानाला आग लागल्याचे समजले.
स्थानिक रहिवाशांच्या मदतीने त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर दीड तासांनी आग आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात पंकज पाटील यांनी दुकान मालक दीपक मराठे यांनाही घटनेची माहिती दिली.
दुकानातील सर्व साहित्य जळून खाक
आगीमुळे दुकानातील 3 संगणक, 3 प्रिंटर, 1 रेडिअम फ्लोएट, सोनी कंपनीचे दोन व्हिडिओ कॅमेरे, जिंबल, फ्रिज, ए.सी., टी शर्ट प्रिंटींग मशीन, इन्व्हर्टर बॅटरी, साऊंड सिस्टीम, फर्निचर, प्रिंटींग कलर, रेडिअम मटेरीअल, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व डीव्हीआर, महत्वाची कागदपत्रे, मोबाईल असे अंदाजे 4 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा दावा मराठे यांनी केला आहे.
पोलीस दप्तरी घटनेची नोंद नाही
न्यू बी. जे. मार्केटमधील दुकानाला आग लागल्याची माहिती जिल्हापेठ पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलिसांकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पाहणी करुन पंचनामा करण्यात आला नाही. दुकानमालक दीपक मराठे हे स्वतः पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यासाठी गेले. परंतु, पोलिसांनी त्याची नोंद घेण्यास टाळाटाळ केली, असा आरोप दीपक मराठे यांनी केला आहे.