जळगाव - सुमारे ३० वर्षे जुन्या असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने आरोग्य सेविका जखमी झाली. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात असलेल्या अनवर्दे-बुधगाव येथे घडली. या घटनेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या जीर्ण इमारतींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सरला विष्णु चौधरी असे जखमी झालेल्या आरोग्य सेविकेचे नाव आहे. त्या अनवर्दे-बुधगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. त्या नेहमीप्रमाणे ७ ऑगस्टला कामावर आल्या होत्या. सकाळी साडेअकराच्या सुमारास अचानक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. या घटनेनंतर त्यांना हातेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले. डोक्याला मार लागल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
वर्षभरापूर्वी पाठवला होता दुरुस्तीचा प्रस्ताव -
या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ती केव्हाही कोसळून जीवित तसेच वित्त हानी होऊ शकते, ही शक्यता गृहीत धरून वर्षभरापूर्वी जिल्हा परिषदेकडे दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र, जिल्हा परिषदेने त्या प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. त्यामुळेच ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया सरपंच पंडित हिंमत शिरसाठ यांनी दिली.