जळगाव - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱया टप्प्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर मतदारसंघात ३ हजार ६१७ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर २६ हजार १३६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून आज त्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट तसेच स्टेशनरी साहित्य घेऊन सर्व अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.
जळगाव लोकसभा मतदारसंघात १४ तर रावेर लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात एकूण ३४ लाख ३१ हजार ४८५ मतदार आहेत. जिल्ह्यात ७ हजार ९९२ सर्व्हिस मतदार आहेत. निवडणूक कामासाठी नेमणूक असलेल्या १५ हजार २८७ मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे ७ हजार ६१९ मतदारांना मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ३६२ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३६ मतदान केंद्र संवेदनशील आहेत.
मॉकपोलनंतर सुरू होईल मतदान प्रक्रिया-
मतदानाच्या दिवशी मंगळवारी सकाळी ६ वाजता उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. गर्दीच्या मतदान केंद्रांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे.