जळगाव - शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी प्रांजल विलास सोनवणे हिने ९६ टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, प्रांजलने कोणतेही खासगी क्लासेस न लावता स्वयं अध्ययन करत हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या निकालात प्रांजलने घवघवीत यश मिळवल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
प्रांजलने आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. यापूर्वी सातवीत असताना तिने अॅबॅकस परीक्षेतही जिल्हा पातळीवर यश मिळवले होते. त्यानंतर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतही तिने गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. अकरावीत असताना देखील ती वाणिज्य शाखेतून मुळजी जेठा महाविद्यालयात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. आता बारावीच्या परीक्षेतही प्रांजलने ९६ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना सर्वात अवघड वाटणाऱ्या अकाउंटस विषयात तिने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. त्याचप्रमाणे संस्कृत विषयातही तिने १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत.
स्वयं अध्ययनावर दिला भर-
प्रांजलने कोणतेही खासगी क्लासेस न लावता स्वयं अध्ययनावर भर दिला. दिवसातून ५ ते ६ तास सलग अभ्यास केला. पाठांतराऐवजी सतत सराव केला. आई-वडिलांनी देखील अभ्यास कर म्हणून कोणतेही दडपण आणले नाही. वेळोवेळी प्रोत्साहन दिले. आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या बाबी पुरवल्या. तसेच महाविद्यालयातील शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. मित्रमैत्रिणींनी देखील माझा उत्साह कमी होऊ दिला नाही. त्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. माझ्या यशाचे खरे श्रेय आई-वडिलांसह शिक्षक आणि मित्रांना जाते, अशी प्रतिक्रिया प्रांजलने यावेळी बोलताना दिली.
प्रांजल लहानपणापासून अभ्यासात हुशार
प्रांजल लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार आहे. तिला कधीही अभ्यास कर म्हणून सांगावे लागले नाही. तिने यापूर्वीही अनेक मोठ्या परीक्षांमध्ये यश मिळवले असल्याने आताही ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, अशी आम्हाला खात्री होती. तिने मिळवलेल्या यशामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया प्रांजलच्या आई-वडिलांनी दिली.
प्रांजलच्या 'सीए' व्हायचंय!
बारावीच्या निकालात जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावल्यानंतर माझे समाधान झालेले नाही. या यशापर्यंत मला थांबायचे नाही. वाणिज्य क्षेत्रात मला करिअर करायचंय असून मी 'सीए' होणार आहे, असेही प्रांजल म्हणाली.