जळगाव - शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जेवणाचा पुरवठा करणारा ठेकेदार वेळेवर जेवण पुरवत नाही, जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असतो, नियमानुसार रुग्णांना दररोज वेगवेगळ्या प्रकारचे फळे देणे अपेक्षित असताना फक्त केळी दिली जाते, अशा एक नाही तर अनेक तक्रारी कोविड सेंटरमधले रुग्ण करत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन सोमवारी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांनी रुग्णांच्या तक्रारीविषयी अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.
जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट
जळगाव शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात कोविड सेंटर उभारले आहे. सद्यस्थितीत या कोविड सेंटरमध्ये शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. या रुग्णांना दररोज दोन वेळचा नाश्ता व जेवण देण्यासाठी महापालिका प्रशासनाने पूजा केटरर्स नावाच्या संस्थेला ठेका दिला आहे. त्यानुसार ठेकेदाराला प्रतिव्यक्ती 140 रुपये महापालिका प्रशासन अदा करत आहे. मात्र, असे असताना ठेकेदाराकडून पुरवल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
दोन दिवसांपासून वाढल्या होत्या तक्रारी
महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही, काही रुग्णांना तर नाश्ता व जेवण उपलब्धच होत नाही, जेवणात फळ म्हणून दररोज केळीच दिली जाते, अशा स्वरुपाच्या तक्रारी रुग्णांकडून केल्या जात होत्या. दोन दिवसांपासून या तक्रारी वाढल्या होत्या. काही रुग्णांनी जेवणाचे व्हिडिओ भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांना पाठवले होते. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सोनवणे तत्काळ ऍक्शन मोडमध्ये आले. त्यांनी कोविड सेंटरला भेट देऊन रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत त्यांनी रुग्णांच्या तक्रारींवर तातडीने मार्ग काढण्याच्या सूचना केल्या.
महापौरांशीही साधला संवाद
कैलास सोनवणे यांनी या प्रकारासंदर्भात लागलीच महापौरांशी संवाद साधला. कोविड सेंटरमध्ये पूर्वीप्रमाणे चांगल्या दर्जाचे जेवण पुरवण्यात येईल. अधिकाऱ्यांना तसे आदेश देण्याचे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी दिले आहे.
हेही वाचा - नवी मुंबईत दोन भाऊ, बहिणीसह तिघांवर कोयत्याने हल्ला, छेड काढल्याची तक्रार केल्याने केला हल्ला