जळगाव - ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीने ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघाले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्ष विरहीत मानली जात असली तरी, जळगाव जिल्ह्यात मतदान प्रक्रियेनंतर राजकीय पक्षांमध्ये दावे-प्रतिदाव्यांचे द्वंद्व रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. उद्याच्या निकालात आपल्याच पक्षाचे वर्चस्व असेल, असा दावा प्रत्येक पक्षाकडून केला जात असला तरी निकालानंतरच कोणता पक्ष वरचढ ठरतो, हे स्पष्ट होणार आहे.
कोरोना काळात होत असलेली ग्रामपंचायतीची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असणार आहे. ग्रामीण भागात आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी तशी मोर्चेबांधणी देखील केली. आता काही तासातच या निवडणुकीचे चित्र निकालातून स्पष्ट होणार असल्याने नेतेमंडळीची घालमेल वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात नेमके काय चित्र असेल, याची उत्सुकता मतदारांप्रमाणे राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आहे.
हेही वाचा - ‘चांगला रस्ता शोधून दाखवा’ स्पर्धेचे आयोजन करा; आव्हाड यांचा शिवसेनेला टोला
महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा रंगला सामना
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तारूढ आहे. तर, भाजप विरोधी पक्ष म्हणून भूमिका पार पाडत आहे. राज्यस्तरावरील याच राजकीय मोर्चेबांधणीचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रुपाने ग्रामीण भागात पाहायला मिळाला. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्ष म्हणून नाही तर गावकी-भावकीच्या माध्यमातून लढली जाते. असे असले तरी जळगावात मात्र सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत एकमेकांना आव्हान दिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असाच सामना प्रत्येक ठिकाणी रंगल्याचे दिसून आले. आता निकालानंतरच कोणता पक्ष वरचढ आहे, हे कळणार आहे.
महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, आम्हीच जिंकणार
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबाबत बोलताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले की, जिल्ह्यात आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामपंचायत निवडणुकीला सामोरे गेलो आहोत. ज्या भागात, ज्या पक्षाची ताकद आहे, त्याठिकाणी त्या पक्षाचे उमेदवार दिले, असा फॉर्म्युला आमच्या मित्रपक्षांमध्ये ठरला होता. याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल, असा दावा वाघ यांनी केला. कोरोना, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटाच्या काळातही महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले. जनतेचा कौल आम्हाला मिळेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, वाढती महागाई, बेरोजगारी अशा कारणांमुळे केंद्र सरकार पर्यायाने भाजप विरोधात जनतेच्या मनात रोष आहे. त्यामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. असेच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी व्यक्त केला.
जळगाव जिल्हा भाजपचा बालेकिल्ला, जनमताचा कौल आम्हालाच
भाजपकडून जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. पाटील यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, ग्रामपंचायतीची निवडणूक ही कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर होत नसते. प्रत्येक गावात भावकीच्या माध्यमातून रणनीती ठरत असते. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक उमेदवार म्हणून एकत्र आल्याने त्यात राजकीय पक्षाचे प्रतिबिंब दिसते. हे लक्षात घेतले तर जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. लोकसभा, विधानसभाच नव्हे तर जिल्हा परिषद, पंचायत समितीतही भाजपचे वर्चस्व आहे. याशिवाय, केंद्र सरकारची कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता या भाजपच्या जमेच्या बाजू आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पक्षाचे वर्चस्व असेल, असे पी. सी. पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - औरंगाबाद नामांतर : 5 वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत - बाळासाहेब थोरात