जळगाव - मुक्ताईनगरातून एका ट्रकमध्ये येणारा ६०० किलो गांजा एमआयडीसी पोलिसांच्या तीन पथकांनी सापळा रचून पकडला. या गांजाची किंमत सुमारे ३८ लाख १६ हजार रुपये इतकी आहे. गांजा लपवण्यासाठी ट्रकमध्ये मागच्या बाजूस पामची झाडे ठेवण्यात आली होती. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. मुख्तार रहीम पटेल (वय २४, रा. लोहारा, ता. बाळापूर, जि. अकोला), असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
मुक्ताईनगरातून एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून सुमारे १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची तीन पथक तयार करण्यात आली होती. या पथकांनी नशिराबाद, उमाळा व खेडी या गावांजवळ सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी १२ वाजता मुख्तार पटेल हा ट्रक (एमएच ४२ टी ९१२५) घेऊन मुक्ताईनगरतून निघाला. दुपारी दोन वाजता हा ट्रक जळगाव शहरातील महामार्गावरील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ येताच सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला अडवले. ट्रकची तपासणी केली असता, या ट्रकमध्ये सुमारे ६०० किलो गांजा मिळून आला. गांजा लपवण्यासाठी ट्रकच्या मागच्या बाजूस पामची झाडे ठेवलेली होती. झाडांची वाहतूक करण्याच्या नावाखाली गांजाची तस्करी होत असल्याचे उघड झाले.
ट्रकचालक मुख्तार पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एमआयडीसी पोलिसांनी ३८ लाख १६ हजार रुपये किमतीचा गांजा आणि आठ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ४६ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन, पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, उपनिरीक्षक विशाल सोनवणे, विशाल वाठोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, हेमंत पाटील, चंद्रकांत पाटील, हेमंत कळसकर, सतीश गर्जे, दीपक चौधरी, राजेंद्र कांडेलकर, निलेश पाटील, सचिन पाटील, मुकेश पाटील, विजय बावस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.