जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, असे असताना काही नागरिक अजूनही विनाकारण घराबाहेर फिरत असल्याने पोलीस प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये' आले आहे. बेशिस्त नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद देण्यासह उठाबशा काढण्याची शिक्षा केली जात आहे. चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त असून, वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यात 14 एप्रिलपासून अंशतः निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार 15 मेपासून हे निर्बंध पुढे 1 जूनपर्यंत कायम असणार आहेत. कडक निर्बंधांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काहीअंशी कमी झाली आहे. परंतु, कोरोनाचा प्रादुर्भाव अपेक्षेप्रमाणे घटलेला नाही. म्हणून जिल्हा प्रशासनाने उर्वरित कालावधीत निर्बंधांची अंमलबजावणी अधिक कडक केली आहे. मंगळवारी (दि. 18 मे) दुसऱ्या दिवशीही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
चौकाचौकात पोलीस बंदोबस्त
कोणत्याही प्रकारचे ठोस कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. गणेश कॉलनीतील ख्वाजामिया चौक, कोर्ट चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, आकाशवाणी चौक अशा ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉईंट आहेत.
11 वाजेनंतर फक्त वैद्यकीय सेवेला मुभा
शहरात सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असते. त्यात किराणा दुकाने, दूध व बेकरी प्रॉडक्ट विक्रीची दुकाने, कृषी साहित्य व पशुखाद्य विक्रीची दुकाने, फळे व भाजीपाला विक्री यांचा समावेश आहे. 11 वाजेनंतर फक्त मेडिकल, वैद्यकीय सेवा, बँकिंग सेवा तसेच शासकीय कार्यालये सुरू आहेत. या व्यतिरिक्त काही चालू असेल तर महापालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे.
हेही वाचा - जळगावात कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंधांची अंमलबजावणी; सकाळी 11 नंतर बाजारपेठेत 'शटर डाऊन'