जळगाव - कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी देशभराच रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. या कर्फ्यूला सर्वस्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या जनता कर्फ्यूमुळे जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरातील एक गर्भवती महिला अडचणीत सापडली होती. प्रसवकळा सुरू झाल्याने तिला रुग्णालय हलविण्यासाठी वाहन उपलब्ध होत नव्हते. अशा परिस्थितीत पोलीस तिच्यासाठी देवदूत म्हणून धावून आले.
जामनेर शहरातील जामनेरपुरा भागात राहणाऱ्या अर्चना माळी ही गर्भवती होती. तिला रविवारी सकाळी प्रसवकळा जाणवत होत्या. म्हणून तिला कुटुंबीयांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तिची तपासणी केली. दिवस भरल्याने तिची प्रसूती करणे गरजेचे होते. तिची प्रकृती पाहता डॉक्टरांनी सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्याचा सल्ला दिला. मात्र, सिझर करण्यासाठी येणारा खर्च पेलवणार नसल्याने माळी हिच्या कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयात प्रसूती करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा -#JantaCurfew हिंगोलीत जनता कर्फ्युला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोघांना घेतले ताब्यात
जनता कर्फ्युला सुरुवात झाल्याने अर्चनाला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यासाठी रिक्षा किंवा इतर कोणतेही वाहन उपलब्ध होत नव्हते. अशातच तिच्या प्रसवकळा वाढल्या. समोर कोणताही दुसरा मार्ग नसल्याने तिच्या सासूबाईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती दिली. माळी कुटुंबीयांची अडचण लक्षात घेऊन पोलिसांनी लगेच शासकीय वाहन सोबत घेऊन खासगी रुग्णालय गाठले.
पोलिसांनी अर्चनाला पोलीस वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्याठिकाणी अर्चनाला प्रसूती कक्षात दाखल करण्यात आले. अर्चनाला वेळेवर रुग्णालयात आणले नसते तर, तिच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला असता, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे माळी कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले. यावेळी अर्चनाच्या सासूबाईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते.
हेही वाचा -जनता कर्फ्यू : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिला आपुलकीचा संदेश
दिड वाजता महिलेने दिला मुलाला जन्म
या महिलेने दुपारी दिडच्या सुमारास एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत.