जळगाव - दोन सख्ख्या भावांनी एका विवाहितेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री जळगाव तालुक्यातील शिरसोली शिवारातील शेतात घडली. या दोन्ही नराधमांनी विवाहितेवर अत्याचार करण्यापूर्वी विवाहितेसह तिच्या पतीला बेदम मारहाणदेखील केली होती. घटनेनंतर दोघेही फरार झाले असून, त्यांच्याविरुद्ध बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलशा गंगाराम बारेला व बलशा गंगाराम बारेला (रा. शिरसोली, ता. जळगाव) अशी विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपींची नावे आहेत. या घटनेतील पीडित विवाहिता आणि तिचा पती शिरसोली शिवारातील मोहाडी रस्त्यावर असलेल्या एका शेतात शेत मालकाकडे कामाला आहेत. दोघेही त्याच शेतात राहतात. दोघे आरोपीदेखील शेजारच्या दुसऱ्या एका शेतात कामाला आहेत. त्यांना शेत मालकाने कामावरून काढून टाकले आहे. पीडित विवाहिता आणि तिच्या पतीमुळे शेत मालकाने आपल्याला कामावरुन काढून टाकले आहे, असा समज करून, रागातून दोन्ही भावांनी पीडितेच्या शेतातील झोपडीत जावून तिच्यासह पतीला बेदम मारहाण केली. मारहाण होत असल्याने पीडितेचा पती मदतीसाठी बाहेर पळाला. त्यानंतर संशयित आरोपी कलशा व बलशा यांनी आळीपाळीने विवाहितेवर अत्याचार केला. या घटनेनंतर दोघेही पळून गेले.
ही घटना घडल्यानंतर आज (बुधवार) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असल्याने त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.