जळगाव - खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटलेल्या एका तरुणाला गावठी पिस्तूल व 3 जिवंत काडतुसांसह पोलिसांनी अटक केली आहे. युनूस सलीम पटेल उर्फ सद्दाम पटेल (वय 30, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. गावठी पिस्तूलासह तो काहीतरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने त्याचा डाव फसला.
खान्देश सेंट्रल मिल परिसरातून आवळल्या मुसक्या-
युनूस पटेल हा गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह शहरातील खान्देश मिल परिसरात फिरत होता. ही माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय येरुळे पोलीस कर्मचारी अक्रम शेख, भास्कर ठाकरे, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, गणेश पाटील, रतन गीते, प्रवेश ठाकूर यांच्या पथकाने खान्देश सेंट्रल मिल परिसरात सापळा रचला. संशयित आरोपी युनूसला ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडे 10 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल आणि 3 काडतुसे मिळून आली. पोलिसांनी त्याला अटक करून पिस्तूल व काडतुसे जप्त केली.
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-
याप्रकरणी संशयित आरोपी युनूस पटेल याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पिस्तूलाच्या मदतीने कोणता गुन्हा करण्याच्या तयारीत होता? याचा पोलीस तपास करत आहेत.
खुनाच्या गुन्ह्यात सुटला आहे निर्दोष-
संशयित आरोपी युनूस पटेल हा खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटलेला आहे. त्याच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून मिळाली.