जळगाव - गेल्या अनेक वर्षांपासून सिंधी कॉलनी परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या ‘जॉनी’ या वृद्धाने रामेश्वर कॉलनीतील १२ वर्षीय मुलाचे २३ डिसेंबर २०१९ ला अपहरण केले. या मुलाला देखील त्याने भीक मागयला लावले. त्या मुलाकडून मिळणाऱ्या पैशातून तो स्वत: दारू पिऊन मौजमजा करत होता. एमआयडीसी पोलिसांनी या ‘जॉनी’ला बुधवारी अटक केली.
हेही वाचा - 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'
बापु उर्फ जॉनी शंकर शिंपी (वय ६०, रा.कांचननगर) असे या ‘जॉनी’चे नाव आहे. पीडित मुलगा हा रामेश्वर कॉलनीतील रहिवासी आहे. २५ डिसेंबरला तो तुळजामातानगर परिसरात असताना जॉनीने त्याचे अपहरण केले. त्या दिवसापासून या मुलाचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. तर, जॉनी हा त्या मुलाला घेऊन सिंधी कॉलनी परिसरात गेला होता. दररोज त्या मुलाला भीक मागयला लावत होता. लोकांकडून त्या मुलाला मिळालेले पैसे जॉनी स्वत:कडे ठेऊन घ्यायचा. यानंतर त्याच पैशातून दारू पिऊन मौजमजा करत होता.
दुसरीकडे या मुलाचे कुटुंबीय त्याला शोधत होते. अखेर बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना त्या मुलाची माहिती मिळाली. हा मुलगा सिंधी कॉलनीत भीक मागत असल्याचे कळताच पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, सचिन चौधरी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील यांच्या पथकाने सिंधी कॉलनीत धाव घेऊन मुलाला शोधून काढले. या मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. तर, जॉनी याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.