जळगाव - २०१४ मध्ये सत्तेत येण्यापूर्वी भाजपने जी आश्वासने जनतेला दिली होती, ती सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. गेल्या ५ वर्षातील कामगिरीचा विचार करून जनता निश्चितच योग्य कौल देईल, असा विश्वास रावेरच्या खासदार तथा भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला. पाच वर्षातील कामगिरी आणि इतर अनेक मुद्यावर रक्षा खडसेंनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली.
भाजपला निवडणूक कठीण जाणार नाही
या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाल्या, की २०१४ मध्ये दिलेले प्रत्येक आश्वासन आज पूर्ण होताना दिसत आहे. म्हणून आता लोकांपर्यंत जायला आमच्यावर कोणतेही दडपण किंवा भीती नाही. गेल्या पाच वर्षांचा अनुभवदेखील माझ्या पाठीशी आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही उज्ज्वला गॅस योजना, जनधन योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान विमा योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना डीबीटीद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यापूर्वी कधीही असे झाले नाही. याचा विचार जनता करेलच, म्हणून भाजपला निवडणूक फार कठीण जाणार नाही. खासदार म्हणून काम करण्याची पुन्हा संधी मिळाली तर अजून चांगले काम करण्याचा माझा मानस आहे.
रावेरमध्ये भाजपचे पारडे जड
ही निवडणूक देशपातळीवरची आहे. फक्त रक्षा खडसे आणि डॉ. उल्हास पाटील अशी ही लढत नाही. देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचे आहे, याचा विचार जनता नक्की करेल. जनतेने गेल्या पाच वर्षात भाजपने केलेली कामे पाहिली आहेत. कोण चांगले काम करू शकतो, कोणाच्या मागे किती ताकद आहे, याचाही विचार जनता करते. मला माजीमंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे वेळोवेळी पाठबळ लाभे. त्यामुळे स्थानिक पातळीवर माझ्यासमोर कोण प्रतिस्पर्धी आहे, याने फरक पडत नाही. रावेरात भाजपचे पारडे जड आहे, असे रक्षा खडसे म्हणाल्या.
जातीपातीचा परिणाम होणार नाही
खडसे घराण्याने कधीही जातीचे राजकारण केले नाही. जेव्हा तुम्ही निवडणूक लढवून निवडून येता, तेव्हा तुम्हाला सर्व समाजाला सोबत घेऊन काम करावे लागते. जनता शेवटी काम बघते. आपले काम कोण करणार आहे आणि देशाचे नेतृत्व कोणाच्या हातात आहे, याचा विचार जनता नक्की करते. निवडून आल्यावर तुमचे वैयक्तिक संबंध कसे आहेत, यावर बरंच काही ठरत असते. त्यामुळे जातीय समीकरणांचा फारसा फरक पडत नाही. रावेरात लेवा आणि मराठा समाजाचे प्राबल्य आहे. हे दोन्ही समाज खडसे परिवाराच्या पाठीशी आहेत. एकनाथ खडसे यांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे. ही व्यक्तिगत बाब असली तरी प्रत्येक समाज आमच्यासोबत आहे.
पुन्हा संधी मिळाल्यास भुसावळला रेल्वे प्रकल्प आणण्याची इच्छा
रावेर लोकसभा मतदारसंघ हा ग्रामीण भागात मोडतो. या ठिकाणी शेतकरीवर्ग मोठा आहे. मतदारसंघात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मेगा रिचार्ज प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळात मेगा रिचार्ज प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम झाले आहे. पुढच्या कालखंडात हा प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल. त्याचप्रमाणे भुसावळला रेल्वेचा एक मोठा प्रकल्प आणण्याचा माझा मनोदय आहे. हा प्रकल्प आल्यानंतर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल. तसेच भुसावळला या प्रकल्पामुळे नवीन ओळख मिळण्यास मदत होईल. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. विकास हा न थांबणारा आहे. तुम्ही जसे पुढे जाल तसे अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतील. पण प्रत्येक प्रश्नावर आपल्याला मार्ग काढावा लागेल.