जळगाव - पवित्र रमजान सणानिमित्त घरातच नमाज पठण करण्यात यावे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुस्लीम धर्मगुरुंच्या बैठकीत घेण्यात आला. पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली होती.
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने फैलावत आहे, अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने, मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान सण तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग रोखणे अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी आणि मुस्लीम धर्मगुरू यांच्यात बैठक पार पडली. बैठकीला मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूख शेख अब्दुल्ला, महमूद शाह नजर शाह, शरीफ शाह, अफजलखान बुऱ्हाण खान, शेख अमीर शेख हमीद, हाफिज जाहीद, मुक्तार पटेल, अफजल लुकमान मन्यार, जफर शेख यांच्यासह ३० ते ३५ मशिदींचे ट्रस्टी, मौलाना, प्रतिष्ठित मुस्लीम बांधव हजर होते.
या बैठकीमध्ये रमजान सणानिमित्त नमाज अदा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कोणीही एकत्र येऊन नमाज पठण करणार नाही. तसेच नमाज पठण करताना सोशल डिस्टन्स ठेवावे, मशिदीमध्ये तीन ते चार लोकांनीच नमाज पठण करावे, बाकी इतर लोकांनी आपापल्या घरी नमाज पठण करावे, याबाबत मुस्लीम धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले.