जळगाव - शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत, की खड्ड्यात रस्ते, हेच कळायला मार्ग नाही अशी स्थिती आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार मनपाकडे पाठपुरावा करूनही उपयोग होत नसल्याने जळगावकर नागरिकांचा रोष वाढू लागला आहे. मनपाने आर्थिक परिस्थितीचे कारण देत शहरातील रस्त्यांची कामे करण्यास असमर्थता दर्शवली आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज (सोमवारी) काही नागरिकांनी मनपात येऊन 'हवं तर आमची किडनी घ्या, पण शहरातील रस्ते दुरुस्त करा', अशा आशयाचे निवेदन मनपा प्रशासनाला देत अनोखे साकडे घातले.
हेही वाचा - जळगाव : वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये चौघांचा बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ, तर अन्य दोघे चुलत बहीण-भाऊ
रस्त्यांच्या समस्येला नागरिक वैतागले
गेल्या काही वर्षांपासून जळगाव शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. वैतागलेल्या जळगावकरांनी मनपा प्रशासनाला आपली किडनी घ्यावी, ती विक्री करून मिळालेल्या रकमेतून शहरातील रस्ते तयार करण्याचे साकडे घातले आहे. कर भरून देखील जळगावकरांना सुविधा मिळत नसतील तर, करासोबत किडनी देखील घ्या, मात्र शहरातील रस्ते करा, अशी मागणी नागरिकांनी केली.
लहान मुलांनीही केली अधिकाऱ्यांना विनंती
सोमवारी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक नागरिकांनी एकत्र येऊन मनपा प्रशासनाला रस्त्यांच्या समस्येबाबत निवेदन दिले. यावेळी शिवराम पाटील, विजय बांदल, अमोल कोल्हे, मतीन पटेल, संजय पाटील, अनिल नाटेकर, किरण ठाकूर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. दीपककुमार गुप्ता यांनी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन दिले. विशेष म्हणजे, यावेळी पालकांसोबत काही लहान मुलेही उपस्थित होती. त्यांनीही रस्त्यांच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली.
अनेकांना जडले मणक्याचे विकार, अपघातही वाढले
शहरातील रस्त्यांची स्थिती खराब झाली असून यामुळे जळगावकरांना पाठीचे, मानेचे, मणक्यांचे विकार होत आहेत. त्यात अनेक लहान - मोठे अपघात होवून हाता - पायाला देखील दुखापत होत आहे. इतर विकार होण्यापेक्षा आता आमची किडनी घेवून ती विक्री करून मिळालेल्या रकमेतून खड्डे दुरुस्त केले तर अनेकांना भविष्यात होणाऱ्या त्रासापासून दूर ठेवता येईल, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
हेही वाचा - महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे; भाजप नेते गिरीश महाजन यांची टीका