जळगाव - जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अंतुर्ली येथे मध्यप्रदेश सरकारने कोरोनामुळे तपासणी नाका उभारला आहे. हा नाका मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर असला तरी तो महाराष्ट्रात येतो. या नाक्यावरील अधिकाऱ्यांनी एक रुग्णवाहिका अडवून ठेवल्याने रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बंडू वामन बावस्कर (वय 65 वर्षे), असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव असून ते रावेर तालुक्यातील अंतुर्लीचे रहिवासी होते. दरम्यान, या घटनेनंतर सीमा तपासणी नाका स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे.
बंडू बावस्कर यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईक त्यांना खासगी रुग्णवाहिकेने मुक्ताईनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी तातडीने निघाले होते. रस्त्यात अंतुर्ली फाट्यावर मध्यप्रदेशच्या तपासणी नाक्यावर वाहनाला अडवण्यात आले. तेव्हा रुग्णावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे, अशी विनंती करुनही मध्यप्रदेशच्या पोलिसांनी वाहनास रोखून माघारी पाठवले. नाईलाजाने मागे फिरुन नायगावमार्गे मुक्ताईनगरकडे येताना रस्त्यातच बंडू बावस्करांचा मृत्यू झाला. ते समजताच नातेवाईकांसह नागरिक संतप्त झाले व त्यांनी आंदाेलन सुरू केले. ही माहिती मिळताच खासदार रक्षा खडसे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक नीलेश सोळंके आंदोलनस्थळी पोहचले. नायगावमार्गे रस्ता अत्यंत खराब असल्याने शेतकरी, मजुरांचे हाल हाेतात. मुक्ताईनगर, जळगावसाठी इच्छापूरमार्गे रस्ता चांगला असल्यानेे अंतुर्ली, पातोंडी व नरवेलचे नागरिक त्यामार्गे जातात. परंतु, तपासणी नाक्यावरील परप्रांतीय पोलीस अडवणूक करतात. याबाबतची माहिती घेत खासदार खडसे यांनी बुऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. तेव्हा हा तपासणी नाका शहापूर मार्गावरील जुन्या बुऱ्हाणपूर फाटा रस्त्यावर हलवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेनंतर आली जाग, अंतुर्लीच्या शेतकऱ्यांना मिळणार पास
मध्यप्रदेश पोलिसांचा तपासणी नाका त्यांच्या हद्दीतील जुना बुऱ्हाणपूर फाट्याजवळ हलवण्यात येणार आहे. दोनच दिवस आधी बुऱ्हाणपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या तपासणी नाक्यावरील 3 पोलिसांना निलंबित केले होते. यामुळे मध्यप्रदेशातील पोलिसांचा तपासणी नाका आपल्या राज्यात असताना सुद्धा त्यांनी रुग्णाची गाडी सोडली नाही. आता मध्य प्रदेशातील तो तपासणी नाका जुना बुऱ्हाणपूर फाट्याजवळ जाईल. त्या परिसरातही अंतुर्लीच्या अनेक शेतकऱ्यांची शेती असल्याने त्यांना ये-जा करण्यासाठी पास देणार असल्याचे तहसीलदार शाम वाडकर यांनी सांगितले.