जळगाव - भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवड बैठकीला गालबोट लागले आहे. या बैठकीत भुसावळ तालुका अध्यक्ष निवडीच्या विषयावरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी काही आक्रमक कार्यकर्त्यांनी थेट भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अंगावर शाई फेकली. बैठकीत झालेला वाद पाहून रावसाहेब दानवे यांनी सभागृहातून काढता पाय घेतला.
भाजपच्या पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज जळगाव जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात येणार होती. यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सुरुवात झाल्यानंतर भुसावळ येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भुसावळ तालुका अध्यक्षपदाच्या निवडीचा विषय उपस्थित करत रावसाहेब दानवे यांना निवेदन देण्याची विनंती केली. नेत्यांनी निवेदन स्वीकारण्यास अनुमती दिल्यानंतर काही कार्यकर्ते व्यासपीठाच्या दिशेने गेले. यावेळी भुसावळ येथील दोन गटांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने कार्यकर्ते आपसात भिडले. काही कळायच्या आत काही अज्ञात कार्यकर्त्यांनी थेट रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या दिशेने शाई फेकली. या गोंधळात जळगाव जिल्हा भाजपतील एका पदाधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले.
बैठकीत वाद झाल्याचे पाहून पोलिसांनी धाव घेत आक्रमक कार्यकर्त्यांना बैठकीच्या सभागृहातून बाहेर काढले. त्यानंतर पुन्हा बैठक सुरू झाली आहे. मात्र, हा वाद पाहून रावसाहेब दानवे आणि इतर काही प्रमुख नेतेमंडळी बैठक अर्धवट सोडून बाहेर पडले.
जिल्हाध्यक्ष पदाचे नाव निश्चित करताना भाजपच्या नाकीनऊ? विशेष बैठकीपूर्वी खलबते
भाजपच्या पक्षांतर्गत निवडणूक कार्यक्रमांतर्गत आज (शुक्रवारी) जळगाव जिल्हाध्यक्षाची निवड केली जात आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष पदाचे नाव निश्चित करताना भाजपच्या नाकीनऊ आल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष बैठकीत नाराजीनाट्य उदभवू नये म्हणून वरिष्ठ नेतेमंडळी प्रत्येक पाऊल जपून टाकत आहे. विशेष बैठकीपूर्वी नेत्यांनी अजिंठा विश्रामगृहात बंद खोलीत बैठक घेत काही नावांवर चर्चा केली.