जळगाव - शरीराला जडलेली व्याधी, वेदना कायमची दूर व्हावी, असे प्रत्येक रुग्णाला वाटते. अनेकदा ताे जेथे वैद्यकीय उपचार घेताे तेथील वातावरण कसे आहे? यावरही रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ठरते. हीच बाब लक्षात घेऊन कुंचल्यांच्या फटकाऱ्यांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भिंती, झाडांवर निसर्ग, इन्स्टाॅलेशन, वारली चित्रे रेखाटली जाताहेत. अर्थात, रुग्णांच्या वेदनेवर औषधाबराेबरच चित्रकलेची मात्रा दिली जात आहे.
रुग्णालयाचे वातावरण प्रफुल्लित करणारं -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे जे रुक्ष वातावरण आहे ते प्रफुल्लित करण्याचं पाऊल अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी उचलले आहे. आठ महिन्यांपासून काेराेनामुळे काेविड वाॅर्ड बनलेल्या शासकीय रुग्णालयातील भंगार काढून अडगळ दूर करण्यात आली. इमारतींची रंगरंगाेटी करण्यात आली. दुसरे प्रवेशद्वार ते व्हायराॅलाॅजी लॅबपर्यंत नव्याने डांबरीकरण करण्यात आले. रस्त्याच्या दाेन्ही बाजूला पेव्हर ब्लाॅक लावले. आवारातील इमारतींच्या भिंती, झाडांच्या बुंध्यांवर रंगसंगतीचा अभ्यास करून ज्ञानदेव विश्वसंस्कृती गुरुपीठ मल्टिपर्पज साेसायटीचे 10 कलावंत निसर्गरम्य देखावे, वारली चित्रे रेखाटत आहेत.
चिमणीची सजावट करणार -
दर्शनी भागातील इमारतींच्या भिंतींवर चित्र रंगवली जात असल्याने महाविद्यालयाचा चेहरामाेहराच बदलेल. त्यासाेबत परिसरातील विविध वृक्षांचे बुंधे, वाॅर्ड, जुन्या इमारती आदींचा समावेश त्यात आहे. त्यासाठी 60 लिटर डिस्टेम्पर, 96 बाॅटल स्नेनर लागेल. तसेच सिव्हिलच्या जुन्या भंगारात सापडलेली जुनी चिमणीही सजवण्यात येणार आहे.
हेही वाचा - कोव्हॅक्सिन चाचणीचा तिसरा टप्पा; दिल्लीमध्ये मिळेनात स्वयंसेवक
प्रसन्न चित्रांवर भर -
शासकीय कार्यालय म्हटले की, उपदेश, शासकीय याेजनांची माहिती देणारे विचार डाेळ्यासमाेर येतात. मात्र, येथे सर्वच प्रमुख दर्शनी भागातील इमारतींवर वेगवेगळे निसर्ग चित्र, झाडं, आभाळ, हिरवेगार रान, फुलं, पक्षी तर बालरुग्ण विभागात लहान मुलांसाठी कार्टून्स रेखाटण्यात येणार आहेत. परिसरात येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मनाला अल्हाददायक वाटावे, असा प्रयत्न असल्याने ही चित्रकल्पना निवडली. त्यासाठी ज्ञानदेव साेसायटीच्या अध्यक्षा वैशाली काटे, सचिव अविनाश काटे, मच्छिंद्र भाेई, हर्षल कदम, सत्यनारायण पवार, भाग्यश्री साेनार, अश्विनी पाटील, अविका काटे व दहा जणांची टीम दाेन दिवसांपासून चित्र काढतआहे. आठवडाभरात हे काम पूर्ण हाेण्याचा अंदाज असल्याचे अविनाश काटे यांनी सांगितले.
जुन्या इमारतीला अॅन्टिक लूक -
प्रवेशद्वार क्रमांक 2च्या रस्त्यावर असलेल्या जुन्या निवासस्थानाची जपणूक करण्यात येणार आहे. या इमारतीला आदिवासी बांधवांच्या कुटीचा (झाेपडी) लूक देण्यात येणार आहे. त्यावर वारली पेंटिंग करण्यात येणार असल्याचे वैशाली काटे यांनी सांगितले. अशा प्रकारे चित्रे आणि निवासस्थान असलेले हे कदाचित राज्यातील पहिले जिल्हा रुग्णालय असेल, असेही त्यांनी सांगितले.