जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्यावतीने भारताच्या परराष्ट्रीय धोरणाचे नवीन परिणाम या विषयावर सात दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. ५६० जणांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. या कार्यशाळेत भारताच्या कोविड डिप्लोमेसीवर देखील चर्चा करण्यात आली.
विविध विषयांवर चर्चा
दि.२० ते २७ फेब्रुवारी या कालावधीत ही कार्यशाळा पार पडली. यामध्ये भारताचे कोरोना धोरण, कोरोना काळात भारताने गरजू राष्ट्रांना केलेली मदत आणि त्यातून निर्माण झालेली भारताची प्रतिमा, भारत -चीन संबंध, चीनचे विस्तारवादी धोरण, पाकिस्तान आणि चीनची वाढती जवळीक, त्याचा भारतावर होणार परिणाम अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती
या चर्चासत्रात डॉ.लियाकत खान, डॉ.विजय खरे, ब्रिगेडीअर हेमंत महाजन, मोहम्मद मुदस्सर कमर, रोहन चौधरी, डॉ. दिलीप मोहिते, डॉ.नंदकिशोर कुमार यांनी आपली मते मांडली. प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार यांनी समारोप केला. प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहूलीकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ.अनिल चिकाटे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.