जळगाव - एरंडोल येथील शंकरनगर गांधीपूरा परिसरातील रहिवासी राहुल लहू पाटील (वय - 30 वर्षे) हा जवान पंजाब पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. पंजाबमधील फजलखां येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थानी पाटील यांचा परिवार वास्तव्यास होता. तेथून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर भारत पाकिस्तानच्या सीमेवर राहुल पाटील हे कर्तव्य बजावत होते. यासंदर्भातली माहिती लष्कराकडून जळगाव जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आली आहे.
या घटनेमुळे एरंडोल शहरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी 5 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास व्हिडिओ कॉल करून एरंडोल येथील त्यांच्या भावाशी आईशी बोलताना सांगितले की, पुढच्या महिन्यात मी माझ्या परिवारासह घरी येणार आहे. यावेळी पाटील यांनी व्हिडिओवरुन भाऊ आणि आईला कर्तव्य बजावत असलेल्या स्थळाचे चित्र दाखविले. एक भाऊ आणि आई एरंडोल येथे पाण्याच्या टाकी जवळ वास्तव्यास आहे. ते 2009मध्ये लातूर येथे लष्करात भरती झाले होते. ते बीएसएफमध्ये सेवेत होते. त्यांना दोन मुली असून पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींसह ते पंजाबमध्ये वास्तव्याला होते.
हेही वाचा - ठाणे: कोरोनात वीरमरण आलेल्या योद्ध्यांच्या वारसांना पोलीस सेवेत संधी
गेल्या दोन महिन्यात चार जवानांना वीरमरण -
गेल्या दोन महिन्यात जळगाव जिल्ह्यातील चार जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले. त्यात चाळीसगाव तालुक्यातील तिघांचा समावेश आहे. यापूर्वी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण आले. देशमुख हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यातीलचं वाकडी येथील जवान अमित साहेबराव पाटील यांचे कर्तव्यावर असताना अपघाती निधन झाले होते. त्यांच्या अंगावर बर्फाचा ढिगारा पडून ते गंभीर जखमी झाले होते. सागर रामा धनगर या जवानालाही मणिपूर येथे 31 जानेवारीला वीरमरण आले आहे आता पुन्हा जिल्ह्यातील चौथ्या जवानाला वीरमरण आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
उद्या सायंकाळ पर्यंत होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार?
वीर जवान राहुल पाटील यांचे पार्थिव उद्या शनिवारी सकाळी दिल्लीहून विमानाने मुंबईपर्यंत आणण्यात येणार आहे. तेथून ते स्पेशल विमानाने औरंगाबाद येथे पार्थिव दाखल होईल. यानंतर तेथून ते जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे आणण्यात येणार आहे. सायंकाळी शासकीय इतमामात जवान राहुल पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.