जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ महिन्यांनंतर गुरुवारपासून नॉन कोविड रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयात ३०० खाटांवर नॉन कोविड सेवा उपलब्ध असणार आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी रावेर तालुक्यातील निंभोरा येथील रत्नाबाई एकनाथ भिल या महिला रुग्णासाठी पहिला केसपेपर देऊन ओपीडी सेवा सुरू झाली.
केसपेपर काढून घेता येणार उपचार
नॉन-कोविड रुग्णसेवेला प्रारंभ करताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, प्रशासकीय अधिकारी आर. यू. शिरसाठ, प्र. अधिसेविका कविता नेतकर, डॉ. सतीश सुरळकर, डॉ. संजय बनसोडे आदी उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नॉन कोविड रुग्णसेवेला प्रारंभ करण्यात आला असून, ओपीडीसाठी केसपेपर काढण्यासाठी दररोज सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. या काळात केसपेपर काढून रुग्णांना उपचार घेता येणार आहेत. विशेष म्हणजे, गुलाबराव देवकर महाविद्यालयातील अपघात विभागदेखील पूर्वीप्रमाणे रुग्णालयात हलविण्यात आला आहे. त्यामुळे अपघातात जखमी झालेल्या नागरिकांवर याठिकाणी उपचार केले जाणार आहेत.
केसपेपरसाठी ४ टेबल राखीव
रुग्णालयात रुग्णांना केसपेपर काढण्यासाठी चार टेबल लावण्यात आले आहेत. रुग्णाचा केसपेपर काढल्यानंतर समोरील बाजूस वैद्यकीय सेवेसाठी तो आत दिला जाईल. उपचार मिळाल्यानंतर रुग्ण लवकर घरी जाण्यासाठी योग्य पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. रूग्णालयात सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ओपीडीची वैद्यकीय सेवा सुरू राहणार आहे. रुग्णांच्या मदतीसाठी स्वतंत्र जनसंपर्क कक्षदेखील तयार करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरील इमारतीत अपघात, दुखापती, जळीत, सर्दी-खोकला, ताप, डोळे तपासणी, करण्यात येणार आहे. त्याचबरोबर नाक-कान-घसा, गर्भवती महिलांवर उपचार, लसीकरण, मधुमेह, हृदयरोग, बालरोग, दंतचिकित्सा, किडनी आजार, प्राण्यांचा चावा, लहान शस्त्रक्रिया, सोनोग्राफी, अस्थी विकार, मलेरिया, डेंग्यू आदी उपचार रुग्णांना मिळणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी रुग्णांनी रेशन कार्ड व आधार कार्ड सोबत घेऊन येण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.
कोविडसाठी १२५ खाटा राखीव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रुग्णालयाची आता दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. एका विभागात ३०० खाटांवर नॉन-कोविड रुग्णसेवा सुरू राहील. तर कोरोनाच्या रुग्णांसाठी वेगळ्या इमारतीत १२५ खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी झालेली आहे. रुग्णालयात ६५ संशयित रुग्ण दाखल आहेत.