जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. रविवारी पुन्हा 979 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 70 हजार 627 इतकी झाली आहे. दुसरीकडे, चिंतेची बाब म्हणजे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तब्बल 27 डॉक्टरांसह 48 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून, आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एकूण 61 हजार 602 रुग्ण -
जिल्हा प्रशासनाला रविवारी रात्री 5 हजार 245 तपासणी अहवाल प्राप्त झाले. त्यात 979 नवे बाधित समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे रविवारी दिवसभरात पुन्हा 6 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्याही वाढून 1 हजार 444 इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात 667 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आतापर्यंत 61 हजार 602 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्या वाढतीच -
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अॅक्टिव्ह रुग्णसंख्यादेखील वाढतच चालली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7 हजार 581 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यातील 5 हजार 997 रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत, तर 1 हजार 584 रुग्ण लक्षणे असलेले आहेत. 297 पॉझिटीव्ह रुग्ण हे ऑक्सिजनवर आहेत. तसेच 240 रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
जळगाव शहरातील रुग्णसंख्येचा आलेख वाढताच -
जळगाव शहरातील संसर्गाचा वेग कायम आहे. रविवारी शहरात 376 नवे रुग्ण समोर आले. त्याचप्रमाणे भुसावळ तालुक्यात 137, चोपड्यात 101, धरणगावात 82, एरंडोलमध्ये 92 विक्रमी रुग्ण आढळले.
'जीएमसी'त आरोग्य यंत्रणा ढेपाळली -
जीएमसी अर्थात जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तब्बल 27 डॉक्टरांसह 48 कर्मचाऱ्यांनाही गेल्या 5 दिवसांत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. रुग्णालयातील 27 डॉक्टर्स, 10 नर्सिंग, 3 टेक्निशियन, 1 फार्मासिस्ट, नर्सिंग स्टाफ प्रमोशनचे 7 कर्मचारी असे एकूण 48 जण पॉझिटीव्ह आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद हे देखील पॉझिटीव्ह असून उपचार घेत आहेत.
लसीकरण केंद्रासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी -
दरम्यान, शहरातील मायादेवी नगरात रोटरी हॉलमध्ये सुरू असलेले शासकीय लसीकरण केंद्र हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात येणार होते. यासाठी रविवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रुग्णालयात येऊन जागेची पाहणी केली. हे केंद्र नेत्र कक्षाजवळच्या इमारतीत सुरू केले जाणार होते. पण ही जागा योग्य नसल्याने लसीकरण केंद्र रेडक्रॉस सोसायटीच्या जागेत हलवण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करून जिल्हा रुग्णालयात 82 खाटांची क्षमता असलेला एक नवा वॉर्ड उद्या (सोमवारी) उभारला जाणार असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा - व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जी यांची डरकाळी; म्हणाल्या... 'जखमी वाघिन जास्त घातक, खेला होबे'