जळगाव -जिल्ह्यातील जामनेर शहरात कोरोना संसर्गाचा विस्फोट झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली असून, आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. असे असताना संकटमोचक व आरोग्यदूत म्हणवून घेणारे जामनेरचे आमदार गिरीश महाजन जामनेरवासीयांना वाऱ्यावर सोडून, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त झाल्याचा आरोप करत, जामनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवारी गिरीश महाजन यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. 'आमदार गिरीश महाजन दाखवा, 10 लाख रुपये मिळवा' असे फलक हातात घेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.
संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील दररोज हजार ते बाराशे नवीन रुग्ण आढळत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असलेल्या जामनेर तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. एकीकडे जामनेरात कोरोना संसर्ग वेगात असताना जामनेरचे आमदार मात्र, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जामनेर शहरातील नगरपालिकेसमोर आज हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
'गिरीश महाजन तुम्हाला जनता शोधत आहे'
यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हातात ‘तालुक्याचे आमदार माजीमंत्री व संकटमोचक म्हणून ख्याती असलेले आरोग्यदूत आ. गिरीश महाजन साहेब आहे तरी कुठे? आपणास संपूर्ण तालुका व जामनेर शहरातील रहिवासी शोधत आहेत…! आता तरी कोरोनाच्या महामारीत मदतीला धावून या...’ असे लिहिलेले फलक घेतले होते. तसेच 'गिरीश महाजन यांना दाखवा व दहा लाख रुपये मिळवा' अशा घोषणा राष्ट्रवादीचे पदाधिकारी देत होते. कोरोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात सर्व आमदार आपापल्या कार्यक्षेत्रात शक्य ते कामकाज व उपाययोजना करत आहेत. अशावेळी गिरीश महाजन यांची तालुक्याला गरज असताना, ते येथे दिसत नसल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली.
'जनतेला तुमची गरज'
आता भाऊ खूप झाले. जामनेरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. जनता भयभीत झाली आहे. जनतेला तुमची गरज आहे. आमदार म्हणून जनतेला धीर देण्याचे काम तुमचे आहे, पण तुम्ही बंगालमध्ये निवडणुकीत व्यस्त आहात. तुम्हाला जनतेपेक्षा पक्ष महत्त्वाचा आहे. आता तरी तुम्ही जामनेर तालुक्यात या, व जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध व्हा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी गिरीश महाजन यांना आंदोलनाच्या माध्यमातून केले. या आंदोलनाला विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, संदीप हिवाळे, विनोद माळी, अनिस पठाण, सागर पाटील यांची उपस्थिती होती.
हेही वाचा - ऑक्सिजन पुरवठ्यात कोणी अडथळा आणत असेल तर फासावर लटकवा-दिल्ली उच्च न्यायालय