जळगाव - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक ही भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पण तरीही तेथील जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला कौल देत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीवर भाष्य केले आहे.
एकनाथ खडसे हे रविवारी मुक्ताईनगरात त्यांच्या फार्महाऊसवर होते. यावेळी ते पश्चिम बंगाल निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलत होते. खडसे पुढे म्हणाले की, पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालात ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला दोन तृतीयांश बहुमत मिळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. ही निवडणूक भाजपाने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपाचे देशभरातील प्रमुख कार्यकर्ते प्रचारात उतरले होते. येनकेन प्रकारे तेथील सत्ता काबीज करावी, या दृष्टीने भाजपा रिंगणात उतरला होते, पण जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर विश्वास दाखवत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले आहे, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपाची जोरदार मुसंडी, समाधान आवताडे यांची विजयाकडे वाटचाल