जळगाव - युवकांना २ कोटी रोजगार देऊ, वाढलेली महागाई कमी करू, सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन आणू, अशी अनेक आश्वासने देऊन मोदी सरकार सत्तेत आले. परंतु, गेल्या साडेचार वर्षात मोदी सरकारने आश्वासने पूर्ण न करता जनतेची फसवणूक केली, असा आरोप करत जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसने पकोडे तळून मोदी सरकारचा निषेध केला.
पकोडे तळताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोदी सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'जवाब दो' आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारने घेतलेले सर्वच निर्णय फसले आहेत. नोटाबंदीमुळे व्यापार, उद्योग क्षेत्राची पिछेहाट झाली. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. नवीन रोजगारनिर्मिती करण्यात सरकारला अपयश आले. त्याचप्रमाणे महागाईचा आलेख वाढला. सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले, असा आरोप आंदोलनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. देशभरात वाढलेल्या बेरोजगारीच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनावेळी हातगाडीवर पकोडे तळून ते लोकांना वाटण्यात आले. मोदी सरकारविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणला होता. आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील उपस्थित होते.