जळगाव - भाजप नेता जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या विरोधात जळगावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते या पुस्तकाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. दोन्ही पक्षांच्या वतीने पुस्तकाचे लेखक, भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच हे वादग्रस्त पुस्तक मागे घेण्याची मागणी करण्यात आली.
हेही वाचा... ठेवीदार संकटात; बंगळुरुमधील 'या' सहकारी बँकेवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील आकाशवाणी चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी महामार्गावरील वाहने अडवून जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगराध्यक्ष नामदेव चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. संतप्त आंदोलकांनी पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्या छायाचित्राला जोडे मारत आपला निषेध नोंदवला. हे पुस्तक म्हणजे ढोंगीपणा आणि चमचेगिरीचा उत्कृष्ट नमुना आहे. यातून भाजपचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे, अशी टीका यावेळी गुलाबराव देवकर यांनी भाजपवर केली.
हेही वाचा... 'मॅडम, मला तुमचा नंबर हवाय'...पुणे पोलिसांचे भन्नाट ट्वीट व्हायरल!
दुसरीकडे, काँग्रेसच्या वतीनेदेखील या वादग्रस्त पुस्तकाला विरोध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली. काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला. जळगाव जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, तालुका अध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जय भगवान गोयल यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवरायांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. असे असताना भाजपने वादग्रस्त पुस्तक प्रकाशित करून खोडसाळपणा केला आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या वतीने देण्यात आली.
हेही वाचा... पुणे शहरातील पाषाण तलावाजवळ आढळली जुळी अर्भक