जळगाव- माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे (वय २८, रा. शिवाजीनगर) याची अज्ञात तरुणांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास जळगावातील शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ घडली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
राकेश सपकाळे व त्याच्या लहान भावाचे काही दिवसांपूर्वी शनिपेठेतील तरुणांशी भांडण झाले होते. तेव्हापासून या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री ११.३० वाजता राकेश हा स्मशानभूमी परिसरातून येत असताना दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर रस्त्यावरुन येणाऱ्या एका धावत्या ट्रकसमोर ढकलेले. या ट्रकचा फटका राकेशच्या डोक्याला बसला. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला. यानंतर मारेकऱ्यांनी चाकुने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर वार करुन घटनास्थळाहून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या राकेशचा काही वेळात मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, काही मिनिटातच या घटनेची माहिती शिवाजीनगर परिसरात पसरली. माजी महापौर अशोक सपकाळेंसह कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत राकेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणी करुन डॉक्टरांनी राकेशला मृत घोषित केले.
दोन दुचाकी जप्त
घटनास्थळावर राकेशची मोपेड व आणखी एक दुचाकी पडून होती. मारेकऱ्यांनी स्वत:ची दुचाकी देखील घटनास्थळी सोडून पळ काढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोन्ही दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
हेही वाचा- धक्कादायक..! विद्यूत शॉक देऊन वाघाची शिकार; नखे आणि दातांसह २ आरोपींना अटक
हेही वाचा- धक्कादायक! तेरा दिवसाच्या बाळाचा आईने केला खून: कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क