जळगाव - सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या पंधरवड्यापासून दररोज दोन आकडी संख्येने नवीन रुग्ण समोर येत होते. मात्र, काल (सोमवारी) साडेतीन महिन्यानंतर एकाच दिवशी जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या शंभरीपार गेली.
हेही वाचा - अकोला शहरातील 29 कोरोना हॉटस्पॉट; गर्दीच्या ठिकाणी आरटीपीसी टेस्ट मोहीम
सोमवारी दिवसभरात जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये तब्बल 124 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. गेल्या 15 दिवसांत तब्बल 682 नवे रुग्ण समोर आले असून, आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. ही सर्वांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती ओढवली असून, आता वेळीच खबरदारी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती आहे.
कोरोनाचा जिल्ह्यातील रिकव्हरी रेट आता 96 टक्क्यांच्या पुढे गेला असला तरी मृत्यूदर मात्र आटोक्यात येत नसून, तो पूर्वीप्रमाणे 2.37 टक्क्यांवर कायम आहे. एकूणच जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने नोंदवले आहे. गेल्या पंधरवड्यात जिल्ह्यात 682 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क असली तरी नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मार्च 2020 मध्ये झाली होती पहिल्या रुग्णाची नोंद
जळगाव जिल्ह्यात मार्च 2020 महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात संसर्ग आटोक्यात होता. परंतु, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला. कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते. पुढे सप्टेंबर महिन्यात संसर्गाचा वेग काहीसा आटोक्यात आला. ऑक्टोबरच्या प्रारंभी संसर्गाचा वेग कमी होता. परंतु, नवरात्रौत्सव, दसरा आणि त्यानंतर आलेली दिवाळी या सणांच्या काळात राज्य शासनाने टाळेबंदीत काहीअंशी शिथिलता प्रदान केल्याने नागरिकांची 'मूव्हमेंट' वाढली. त्यामुळे, तेव्हा जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. नंतर पुन्हा परिस्थिती नियंत्रणात आली होती. पण, आता पुन्हा नागरिकांचा हलगर्जीपणा कोरोनाच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे.
नागरिकांचा हलगर्जीपणाच कारणीभूत
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग मध्यंतरी आटोक्यात आला होता. परंतु, नागरिकांनी हलगर्जीपणा केल्याने संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. बाजारपेठेत असलेली तोबा गर्दी, राजकीय सभा व मेळावे, लग्नसमारंभ अशा जाहीर कार्यक्रमांमध्ये गर्दी अनियंत्रित राहते. धक्कादायक बाब म्हणजे, कोरोनाला अटकाव करण्यासाठी आवश्यक असलेला मास्कचा वापर, वेळोवेळी हात सॅनिटाईझ करणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे, ही त्रिसूत्री नागरिक पाळत नाही. कोरोनाची भीती नसल्याने बहुतांश नागरिक आता मास्कचा वापर करत नाही. हीच परिस्थिती कोरोना वाढीला कारणीभूत ठरत आहे. दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर कमी लक्षणे असलेले रुग्ण गृह विलगीकरणाचा पर्याय निवडतात. मात्र, घरी गेल्यावर ते कुटुंबातील इतर सदस्यांसोबत मिसळतात. यामुळेही कोरोना वाढत आहे.
कोरोनाला अटकाव करणारी त्रिसूत्री पाळायला हवी
कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक बेफिकीर असल्याने प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी फिरत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. त्याला अटकाव करण्यासाठी मास्कचा वापर, वेळोवेळी हात सॅनिटाइझ करणे आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे ही त्रिसूत्री पाळायलाच हवी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढला तरी आरोग्य यंत्रणा भविष्यातील धोका लक्षात घेऊन सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
..अशी आहे जिल्ह्यातील सद्यस्थिती
सध्या जळगाव जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 57 हजार 715 इतकी झाली आहे. यातील 55 हजार 855 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. चिंतेची बाब म्हणजे, यात 1 हजार 367 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 96.78 टक्के इतका समाधानकारक आहे. परंतु, मृत्यूदर 2.37 टक्के असून, तो कमी न होता कायम आहे. कायम असलेला मृत्यूदर ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी आव्हान ठरत आहे. पूर्वी नव्याने समोर येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असायची. परंतु, आता हे प्रमाण घसरले असून, पॉझिटिव्ह आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सारखीच किंवा आसपास असते. यावरून कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
आकडेवारीवर एक नजर
जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या - 493
लक्षणे असलेले रुग्ण - 100
लक्षणे नसलेले रुग्ण - 393
गृह विलगीकरणात असलेले रुग्ण - 383
अतिदक्षता विभागात उपचार घेणारे रुग्ण - 18
ऑक्सिजन सुरू असलेले रुग्ण - 29
कोविड केअर सेंटरमध्ये असलेले रुग्ण - 10
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये असलेले रुग्ण - 58
डेडिकेटेड कोविड रुग्णालयामध्ये असलेले रुग्ण - 42
गेल्या पंधरवड्यातील रुग्णसंख्या - 1 फेब्रुवारी 47, 2 फेब्रुवारी 46, 3 फेब्रुवारी 42, 4 फेब्रुवारी 37, 5 फेब्रुवारी 46, 6 फेब्रुवारी 17, 7 फेब्रुवारी 38, 8 फेब्रुवारी 47, 9 फेब्रुवारी 35, 10 फेब्रुवारी 49, 11 फेब्रुवारी 29, 12 फेब्रुवारी 35, 13 फेब्रुवारी 71, 14 फेब्रुवारी 19, 15 फेब्रुवारी 124
जिल्ह्यातील लसीकरणाची स्थिती
जळगाव जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून पोलीस, महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य, पोलीस तसेच महसूल विभागाच्या सुमारे 12 ते 13 हजार लोकांना लस देण्यात आली आहे.
लसीकरणासाठी जिल्ह्यात 17 केंद्रे उभारण्यात आली असून, प्रत्येक दिवशी एका केंद्रावर 100 जणांना लस देण्याचे नियोजन असते. सुरुवातीला लसीबाबत नागरिकांच्या मनात भीती होती. या शिवाय आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार गर्भवती महिला, स्तनदा माता, गंभीर आजारातून बरे झालेले, कोरोनाची लक्षणे असलेले तसेच को-मोर्बिड रुग्णांना लस देता येत नाही. अशा लोकांना लसीकरणातून वगळावे लागत होते. त्यामुळे, लसीकरणाची टक्केवारी खूपच कमी होती. आता मात्र ही टक्केवारी वाढत असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - जळगावात लग्नातून १६ लाखांचे दागिने लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद