जळगाव - शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून लग्न समारंभ, आठवडे बाजार, बाजार समिती, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांकडून शासनाच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला वेळीच अटकाव घालून दुसरी लाट रोखण्यासाठी गर्दीचे कार्यक्रम आणि ठिकाणी मनपाचे पथक लक्ष ठेवणार असून नियम मोडल्यास कारवाई करण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर भारती सोनवणे यांनी घेतलेल्या बैठकीला उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, उपायुक्त शाम गोसावी, नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांच्यासह मनपाचे इतर डॉक्टर उपस्थित होते.
मनपाकडे मुबलक टेस्ट किट उपलब्ध -
जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मनपा प्रशासन सतर्क आहे. संशयित रुग्णांची दररोज कोरोना चाचणी केली जात असून मुबलक प्रमाणात आरटीपीसीआर किट आणि अँटीजन टेस्ट किट उपलब्ध असल्याची माहिती डॉ.रावलानी यांनी दिली.
नवीन डॉक्टर, कर्मचारी भरतीसाठी प्रस्ताव -
जळगाव मनपाने कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवकांची भरती केली होती. सध्या शहरात रुग्ण वाढत असल्याचे लक्षात येत असल्याने पुन्हा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, असे उपायुक्त शाम गोसावी यांनी सांगितले. महापौर भारती सोनवणे यांनी याबाबत प्रस्ताव तयार करून आयुक्तांकडे पाठवावा अशा सूचना केल्या.
हेही वाचा - नियमांचे पालन करा, अन्यथा लॉकडाऊनला समोर जावे लागेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शहरात महिन्यातून तीन वेळा फवारणी करावी -
जळगांव शहरात सद्यस्थितीत डेग्यु, मलेरिया यासह साथीचे रुग्ण आढळून येत आहे. आजारांचा प्रादुर्भाव वाढू नये तसेच शहरवासियांचे आरोग्य अबाधित ठेवणेसाठी डेग्यु, मलेरिया व इतर आजारांच्या प्रतिबंध करणेसाठी शहरात फॉगींग, स्प्रेयींगसह तत्सम कार्यवाही करणे गरजेचे व शहरवासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे झालेले आहे. तरी डेग्यु, मलेरिया व इतर आजारांच्या प्रतिबंध करणेसाठी शहरात महिन्यास किमान तीन वेळेस फॉगींग, स्प्रेयींगसह तत्सम कार्यवाही करणे बाबत संबंधितांना आदेश करावे, असे पत्र महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांना पाठवले आहे.
शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करावा -
जळगांव शहरातील कोरोना रुग्णांची गेल्या काही दिवसातील संख्या लक्षात घेतली असता, रुग्ण दररोज वाढत आहेत. बाजारात किंवा चौकाचौकात नागरीक विना मास्क घोळका करुन उभे असलेले दिसून येतात. लग्न समारंभ, सभा, बैठकी किंवा इतर काही कार्यक्रमात कोरोना संबंधात शासनाने ठरवुन दिलेल्या कोणत्याही निर्देशांचे पालन केले जात नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांनी मास्क लावावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे, कोणत्याही ठिकाणी गर्दी होवु नये यासाठी दक्षता घ्यावी म्हणून आपण आपल्या अधिकारांचा वापर करीत जळगांव शहरात प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी करावे, अशी विनंती महापौर भारती सोनवणे यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.