जळगाव - मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना दुसऱ्या समाजाचे आरक्षण कमी करायचे आहे, असे कुणीही बोलत नाही. ओबीसी समाजाला जर काही लोक एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगत असतील तर त्या लोकांना शोधायला हवे. अशा पद्धतीने कुणी राजकीय पोळी भाजून समाजा-समाजात तेढ निर्माण करत असेल तर ते चुकीचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
आमदार रोहित पवार हे रविवारी (दि. 24 जाने.) पक्ष संघटनाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. या दौऱ्यात सायंकाळी पक्षाच्या जिल्हा कार्यालयातील कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मांडले मत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या कोट्यातून दिले जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या विषयावर पत्रकारांनी विचारणा केली असता आमदार पवार म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. पण, ओबीसी समाजाला जर काही लोक एखादी गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगत असतील तर त्या लोकांना शोधायला हवे. ते अशा प्रकारचा अपप्रचार का करत आहेत, हे एक समजून घेतले पाहिजे. कारण आपल्या राज्यात सर्व समाज, सर्व विचारांचे लोक एकत्रित राहतात. अशा परिस्थितीत राजकीय पोळी जर कुणी भाजून घेत असेल तर ते चुकीचे आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. दरम्यान, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा संवेदनशील आहे. त्यामुळे या मुद्द्यावर खंडपीठात ऑनलाइन पद्धतीने मांडणी करण्याऐवजी त्यावर समोरासमोर प्रत्यक्ष चर्चा व्हावी, अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयात केल्याचे समजते. राज्य सरकारने केलेलव विनंती न्यायालयाकडून मान्य होईल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी कायद्याच्या मुद्द्यावरून साधला केंद्र सरकारवर निशाणा
केंद्र सरकारने नवीन कृषी कायदा पारित करताना राज्यांना, विरोधी पक्षांना तसेच शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा व लोकांचा जो काही राग होता तो आपण दिल्लीत बघू शकतो, असे सांगत आमदार पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा - जळगावातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम संथगतीने