जळगाव - राज्य सरकारने या आधीच सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यायला हवा होता. मात्र, तसे झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास सीबीआय करणार आहे. यात राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली आहे, अशी टीका भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केली आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासंदर्भात गिरीश महाजन यांनी जामनेरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज (19 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेशही मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या विषयावर बोलताना गिरीश महाजन पुढे म्हणाले, या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने आधीच सीबीआयला दिला पाहिजे होता. महाराष्ट्र पोलिसांच्या तपासाच्या गती आणि हालचाली संशयास्पद वाटत असल्याने सुशांतसिंहच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर आज (19 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी या प्रकरणाचा तपास सीबीआय करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच सर्व पुरावे सीबीआयला देण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले. यावर आमदार गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा - 'न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा'