जळगाव - एका तरुणाने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिचे फोटो व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर बदनामीच्या भीतीपोटी मुलीने विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी जळगावातील अयोध्यानगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक झाली आहे.
सचिन रामदास पवार (रा. अयोध्यानगर) असे छेड काढणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सचिन हा अनेक दिवसांपासून या मुलीची छेड काढत होता. अनेकदा तो जबदरस्तीने मुलीच्या घरात देखील प्रवेश करीत होता. या प्रकारासंदर्भात शेजारच्यांनी मुलीच्या आईला काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती. मात्र, बदनामीच्या भीतीपोटी हा प्रकार त्यांनी लपवून ठेवला होता. दरम्यान, सोमवारी सचिन पुन्हा एकदा मुलीच्या घरात शिरला. त्याने तिची पुन्हा छेड काढली. यावेळी तिची आई वरच्या मजल्यावर होती. मुलीची आई खाली आली तेव्हा तो मुलीचा हात ओढून तिला घराबाहेर नेत होता. मुलीच्या आईने त्याला हटकले तसेच घराबाहेर काढले. यानंतर त्याने दरवाजात उभे राहून मुलीचे फोटो व्हाट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर मुलीने बदनामीच्या भीतीपोटी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या सचिनला लगेच अटक -
या प्रकारानंतर मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सचिन पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच सचिन याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक लोकरे, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील यांच्या पथकाने त्याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत.