जळगाव - डोंबाऱ्याच्या खेळात दोरीवरची मुलगी खाली पडू नये, म्हणून डोंबारी ढोलकी वाजवत राहतो. त्याच पद्धतीने राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपने डोंबाऱ्याप्रमाणे ढोलकी वाजवत रहावं. आमचं सरकार पडणार नाही. ते पाच वर्षे चालत राहणार आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने मंत्री गुलाबराव पाटील यांची गुरुवारी खास मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. या मुलाखतीत गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा समाचार घेत, सरकारच्या आगामी काळातील योजनांबाबत दिलखुलास चर्चा केली.
सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त बोलताना कोरोनाच्या संकटातही सरकारने चांगले काम केले-कोरोनासारख्या जागतिक महामारीचे संकट असतानाही राज्य सरकारने गेल्या वर्षभरात अतिशय चांगले काम केले आहे. या वर्षभराच्या काळात सरकारने लोकांसाठी आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्य दिले. त्यात शेतकरी कर्जमाफी, नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाईचा उल्लेख करता येईल. विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा राज्य सरकारने पुरेपूर प्रयत्न केला. या वर्षभराच्या वाटचालीत राज्य सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण तरीही सरकारने लोकाभिमुख काम करण्यावर भर दिला, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
आमचे पाय सरळ पडतात -
विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून महाविकास आघाडीचे सरकार कधीही पडेल, असे वारंवार सांगितले जाते. याबाबत गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ज्यांचे पाय तिरपे पडतात, त्यांचेच पाय एकमेकांत अडकतात. परंतु, आमचे पाय सरळ पडतात. त्यामुळे आमचे पाय एकमेकांमध्ये अडकणार नाहीत. म्हणून आमचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. यापुढेही आम्ही सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी सतत काम करत राहू, अशी ग्वाही गुलाबराव पाटील यांनी दिली.
2024 पर्यंत 'हर घर नल, हर घर जल'-
आतापर्यंत राज्यात प्रत्येक दिवशी प्रतिमाणसी 40 लीटर पाणी दिले जात होते. यापुढे प्रतिमाणसी 55 लीटर पाणी देण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. यासाठी साडेतेरा हजार कोटी रुपयांची एक महत्वाकांक्षी योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. ज्यात 50 टक्के निधी केंद्र सरकार तर उर्वरित 50 टक्के निधी राज्य सरकार देईल. या योजनेच्या माध्यमातून 2024 पर्यंत 'हर घर नल, हर घर जल' हे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न असणार आहे. राज्य सरकारने राज्यात 3 लाख 49 हजार स्वच्छतागृह बांधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी प्रत्येक लाभार्थीला 12 हजार रुपये अनुदान देण्यात आले. कोरोनाच्या संकटातही सरकारने पाण्याच्या बाबतीत निधीची कमतरता भासू दिली नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर सरकार दुप्पट वेगाने काम करेल-
यापुढच्या काळात कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर राज्य आता ज्या वेगाने काम करत आहे, त्यापेक्षा दुप्पट वेगाने काम करेल, अशी ग्वाही देताना गुलाबराव पाटील यांनी, जनतेला राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे, आतापर्यंत ज्या पद्धतीने प्रेम व आशीर्वाद दिले, त्याच पद्धतीने प्रेम व आशीर्वाद देण्याचे भावनिक आवाहन केले.