जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात 14 एप्रिलपर्यंत संचारबंदी जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. संचारबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. मात्र, तरीही या कठीण परिस्थितीचा फायदा घेऊन कुणीही जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करत असेल, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यासाठी गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण आदी उपस्थित होते.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, की कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार शक्य त्या उपाययोजना करत आहे. नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे. ही वेळ संकटात सापडलेल्यांना मदत करण्याची आहे. अडचणीचा फायदा घेऊन पैसा कमविण्याची ही वेळ नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करू नये. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रत्येकाने घरीच थांबावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे - जिल्हाधिकारी
आपल्या जळगाव जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासणार नाही. भाजीपाला, दूध, अन्नधान्य पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. पुढचे 2 महिने ते सहज पुरेल. आपल्या जिल्ह्याची गरज भागवून आपण इतर 2 ते 3 जिल्ह्यांना मदत करू शकतो, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. जीवनावश्यक वस्तूंची गरजेपुरती खरेदी करावी. घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करुच नये. प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले. प्रत्येक तहसील क्षेत्रामध्ये प्रांताधिकारी तसेच तहसीलदारांना परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात 29 संशयितांची वैद्यकीय तपासणी
परदेशासह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या विविध शहरांतून जळगाव जिल्ह्यात आलेल्या एकूण 29 संशयितांची आतापर्यंत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 27 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोघांच्या तपासणीचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र तपासणी विभागात विशेष कक्ष उभारला आहे. त्याठिकाणी 20 बेड राखीव आहेत. तर महाविद्यालयातील निवासी क्वार्टर्समध्ये देखील 20 बेड राखीव आहेत. गरज पडल्यास शहरातील विविध ठिकाणी सुमारे 2 हजार संशयित रुग्णांना क्वारंटाईन करता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली असून पथकही सज्ज आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. तर जिल्हाभरातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयात देखील कोरोना संशयितांच्या तपासणीची व्यवस्था केली असल्याचेही शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले.