जळगाव - आर्यन खान प्रकरणात इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाकडून मीडिया ट्रायल सुरू आहे. त्यात आम्हाला बोलायची काही गरज ठेवलेली नाही, अशा शब्दांत राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीका केली आहे. मंत्री सत्तार हे आज रेल्वेने भुसावळ मार्गे जात असताना त्यांनी भुसावळात रेल्वे स्थानकावर माध्यमांशी संवाद साधला, तेव्हा ते बोलत होते.
काय म्हणाले अब्दुल सत्तार?
आर्यन खान प्रकरणाबाबत मंत्री अब्दुल सत्तार यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, की आर्यन खान प्रकरणात मीडिया ट्रायल सुरू आहे. त्यात आम्हाला बोलायची काही गरज ठेवलेली नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणातील माहिती समोर येईल. या प्रकरणी सुरू असलेली कारवाई, मंत्री नवाब मलिक हे तपासाधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल देत असलेली माहिती, याबाबत सखोल चौकशी झाल्यानंतर सत्यता समोर येईल. त्यानंतरच कोण किती गुंतलेले आहे, कोण चुकीची माहिती देऊ लागले आहे, हे स्पष्ट होईल, असेही मंत्री सत्तार यांनी सांगितले.
'जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार म्हणूनच चौकशी सुरू'
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीबद्दल बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, की जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानेच त्याची चौकशी सुरू आहे. त्या चौकशीचा अंतिम अहवाल अजून आलेला नाही. त्यामुळे जलयुक्त शिवारच्या चौकशीत क्लिन चिट मिळाल्याचे सांगणे चुकीचे आहे, असे सांगत अब्दुल सत्तार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. फडणवीस यांनी घाई करू नये, त्यांना अजूनही आपण मुख्यमंत्री असल्याचे वाटते, असा चिमटा देखील त्यांनी काढला.