जळगाव - अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील रावेर शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. रावेर तालुका मराठा युवा संघातर्फे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी असून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली.
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात असलेल्या घोडसगाव येथे एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली होती. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी रावेर तालुक्यातील समस्त मराठा समाज बांधव एकवटले होते. रावेर तालुका मराठा युवा संघाच्या वतीने शहरातील छोरिया मार्केटपासून मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात शेकडोंच्या संख्येने सर्व समाजबांधव सहभागी झाले होते.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी आरोपीला तत्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा-
- या प्रकरणातील आरोपीला अटक झाली असून त्याला जामीन देऊ नये
- हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा
- या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी
- पीडितेच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत करावी