जळगाव - जळगावातील लोकांशी नेहमी भांडण का करतो?, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने एकाने वडिलांसह लहान भावाची निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र. लो. या गावी शनिवारी रात्री घडली. निलेश आनंदा पाटील असे वडील आणि भावाची हत्या करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
निलेशने वडील आनंदा कडू पाटील व लहान भाऊ महेंद्र आनंदा पाटील यांची चाकूने पोटावर वार करत निर्घृणपणे हत्या केली. निलेश पाटील याचे गावातील काही लोकांशी वाद होते. याच कारणावरून त्याचे वडील आनंदा पाटील आणि लहान भाऊ महेंद्र पाटील यांनी 'तू गावात लोकांशी नेहमी भांडण का करतो आणि विनाकारण वाद का घालतो?' अशी विचारणा करून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते.
मात्र, या गोष्टीचा राग आल्याने निलेशने घरातून चाकू आणून वडील आणि लहान भावावर वार करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर पहूर पोलीस ठाण्यात अश्विनी महेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी व त्यांचे सहकारी करत आहेत. क्षुल्लक कारणावरून सख्खा भाऊ व वडिलांची हत्या झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.