जळगाव - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने बुधवारी (दि. 1 जुलै) शहरातील मुख्य मार्केट असलेले महात्या ज्योतिबा फुले मार्केट पूर्णपणे सील केले आहे.
मार्केटचे सर्व प्रवेशद्वार पत्रे लावून बंद करण्यात आले आहेत. फुले मार्केटमध्ये अनेक अनधिकृत हॉकर्स दुकाने थाटत होते. त्याचप्रमाणे, अनेक दुकानदारही आपली दुकाने उघडत असल्याने महापालिकेने आता या मार्केटमध्ये प्रवेशच बंद केला आहे.
महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांनी बुधवारी दुपारी फुले मार्केटमध्ये अचानक भेट दिली. यावेळी मार्केटमध्ये अनेक हॉकर्सनी आपली दुकाने थाटल्याचे आढळून आले. त्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक मार्केटमध्ये दाखल झाल्यानंतर एकच पळापळ सुरु झाली. उपायुक्त संतोष वाहुळे यांनी हॉकर्सवर कारवाई करून माल जप्त करण्याचे आदेश दिले. वारंवार सूचना देवूनही फुले मार्केटमध्ये अतिक्रमण आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. उपायुक्तांनी फुले मार्केट पूर्णपणे सील करण्याचे आदेश दिले. उपायुक्तांनी आदेश दिल्यानंतर तासाभरात पत्र्यांचा साहाय्याने सर्व प्रवेशद्वार सील करण्यात आले.
केवळ किराणा दुकानांना परवानगी
फुले मार्केटमधील किराणा दुकानांऐवजी इतर दुकाने उघडण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. मार्केटच्या प्रवेशद्वारावरील सील तोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून दररोज 50 हून अधिक हॉकर्सवर नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली जात आहे. तरीही शहरातील रस्त्यांवर अनधिकृतपणे दुकाने थाटण्याचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. बुधवारी देखील महापालिकेच्या पथकाकडून सुभाष चौक, बळीराम पेठ, ख्वॉजामिया चौक, गिरणा टाकी परिसर, गणेश कॉलनी चौक परिसरात 60 हून अधिक हॉकर्सवर कारवाई करण्यात आली.
6 दुकानांना ठोकले सील
महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्त्वाखाली बुधवारी शहरातील विविध मार्केटमधील एकूण 6 दुकाने सील करण्यात आली. जळगाव महापालिका क्षेत्र रेडझोनमध्ये असल्याने मार्केटमधील दुकाने उघडण्यास प्रशासनाने मंजुरी दिलेली नाही. तरीही दुकाने उघडणाऱ्या 6 दुकानदारांवर कारवाई करत त्यांची दुकाने सील केली आहेत.
हेही वाचा - जळगाव: तरुणाची गळफास घेऊन तर वृद्धाची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या