जळगाव - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 21 लाख रुपये किमतीचा गुटखा पकडला. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली फाट्याजवळ झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. गोविंदा विश्वनाथ राऊत (वय 21) आणि गोविंदा सुभाष आखरे (वय 21) अशी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. हे दोघे बुलढाणा जिल्ह्यातील टुनकी, संग्रामपूर येथील रहिवासी आहेत.
चारचाकीतून बुलढाण्याकडे नेते होते गुटखा -
संशयित आरोपी गोविंदा राऊत आणि गोविंदा आखरे हे दोघे चारचाकी वाहनातून गुटख्याची वाहतूक करत होते. हा गुटखा ते बुलढाण्याच्या दिशेने नेत होते. इच्छापूरकडून अंतुर्लीच्या दिशेने एका चारचाकी वाहनातून गुटखा जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर-अंतुर्ली फाट्यावर बसस्थानकाजवळ सापळा रचला होता. गुटखा वाहून नेणारे वाहन येताच पोलिसांनी ते अडवले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात 21 लाख 22 हजार 720 रुपये किमतीचा गुटखा व प्रतिबंधित तंबाखूचा साठा मिळून आला.
हेही वाचा - कोरोनाचे रुग्ण वाढले तर जिल्ह्यातील शाळा बंद ठेऊ - पालकमंत्री गुलाबराव पाटील
तिघांवर गुन्हा झाला -
याप्रकरणी पोलिसांनी गाडी चालक गोविंदा राऊत व त्याचा साथीदार गोविंदा आखरे तसेच गाडी मालक गजानन पांडुरंग दहिकर (रा. टुनकी, संग्रामपूर, जि. बुलढाणा) अशा तिघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.