जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नांद्रामध्ये एका शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे शेतकरी तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची दखल घेत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
वनविभागाने बछड्यांना सुरक्षित अधिवासात हलविले
याविषयी सविस्तर वृत्त असे की, नांद्रा शिवारालगतच्या ताडमळा परिसरातील संजय रामराव पाटील यांच्या शेतात मजूर कामासाठी गेले होते. यावेळी शेतात त्यांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती वन विभागाला दिली. याची माहिती मिळाल्यानंतर वनपाल सुनील भिलावे, जगदीश ठाकरे, अमृता भोई यांनी घटनास्थळी धाव घेत या बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. मादी बिबट्याला आपल्या बछड्यांना घेऊन जाता येईल, अशी जागा निवडण्यात आली. तसेच या बछड्यांवर नजर ठेवण्यासाठी नाईट व्हिजन कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
बिबट्याची दहशत
नांद्रा शिवारातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या भागात गाईच्या वासरांचा बिबट्याने फडशा पाडल्याची घटना ताजी आहे. त्यानंतर शेतात बिबट्याचे बछडे आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने जंगलालगतच्या शेतीला कुंपण करण्याचा विषय मार्गी लावावा, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.