जळगाव - महापालिका प्रशासन, तसेच आरोग्य यंत्रणेकडून योग्य ते नियोजन न झाल्याने कोरोना लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाल्याचे चित्र जळगाव शहरात पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शहरात नव्याने सुरू झालेल्या केंद्रांवर आज नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. नव्याने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा पहिला-वहिला दिवस प्रचंड गोंधळात गेला.
हेही वाचा - जळगावात रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांवर अज्ञातांचा गोळीबार
कुठे इंटरनेट सेवा ठप्प, तर कुठे लसीचे पुरेसे डोस नाहीत
शहरातील मेहरूण येथील मुलतानी दवाखान्यात २०० ची क्षमता असताना एक हजाराचा स्लॉट काढण्यात आला. शिवाय इंटरनेट सेवाही बंद पडल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. लसीकरण केंद्राबाहेर सावलीसाठी मंडप नाही, बसण्याची व्यवस्था नाही, अशा स्थितीत लसीकरणाला आलेल्या नागरिकांना उन्हात ताटकळत थांबावे लागले. चेतनदास मेहता रुग्णालयात तर खूपच गोंधळ उडाला होता. लसीचे डोस प्राप्त झाल्यानंतर शहरात कोरोना लसीकरणासाठी नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात स्वाध्याय भवन व मुलतानी रुग्णालय या ठिकाणी केवळ १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण होत आहे. जिल्ह्यात या वयोगटासाठी हे दोनच केंद्र असल्याने दोनशेच्या ऐवजी एका दिवसात प्रत्येक केंद्रांवर १ हजार स्लॉट काढण्यात आले होते. हे नियोजन काल सायंकाळी उशिरा झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
नागरिकांना संताप अनावर
चेतनदास मेहता रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा डोस असल्याने या ठिकाणी दुसरा डाेस घेणाऱ्या नागरिकांची प्रचंड गर्दी उडाली होती. पहाटे चार वाजेपासून या केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीमुळे गोंधळ उडाला होता. लसीचे पुरसे डोस नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोविशिल्ड लस उपलब्ध असून नेहमीप्रमाणे या केंद्रावर गर्दी उसळली होती. या ठिकाणी दुसरा डोस असणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य दिले जात आहे.
लसीकरणाची गती वाढवण्याचे प्रयत्न सुरू
एकेकाळी कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेला जिल्हा म्हणून जळगाव जिल्हा चर्चेत होता, परंतु जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आता लसीकरणाची गती वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जसजसे डोस उपलब्ध होतील, तसे लसीकरण होईल, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. तर, लसीचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने अडचणी आहेत. राज्य शासनाकडून जेवढे डोस उपलब्ध होत आहेत, तेवढे लसीकरण होत आहे. सर्वांना लस देण्यात येणार आहे. नागरिकांनी घाई न करता नियमानुसार लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले.
हेही वाचा - मध्यरात्री घराला आग लागल्याने दाम्पत्याचा झोपेतच होरपळून मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील गारखेडा येथील घटना