जळगाव - तीन ते चार जणांनी घरात घुसून बाप-लेकीवर चॉपरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना जळगावातील बालाजीपेठेत शनिवारी (दि. 13 जून) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. या घटनेत बाप-लेक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश बद्रीनारायण शर्मा (वय 55 वर्षे), त्यांची मुलगी राधिका सतीश शर्मा (वय 22 वर्षे, दोघे रा. बालाजीपेठ, जळगाव), अशी या घटनेत जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सतीश शर्मा यांचे मोठे बंधू रवीकुमार बद्रीनारायण शर्मा हे कैलास मदनलाल तिवारी (रा. बालाजीपेठ) यांच्या घरात भाड्याने राहतात. घर खाली करण्याच्या विषयावरून दोघांमध्ये वाद आहेत. न्यायालयात हा वाद न्यायप्रविष्ट आहे. याच वादातून शनिवारी (दि. 13 जून) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास रवीकुमार हे जवळ राहत असलेल्या त्यांचे भाऊ सतीश यांच्या घरी जेवायला गेले होते. त्यावेळी रवीकुमारचे घरमालक कैलास तिवारी, सत्यनारायण तिवारी, रोहित तिवारी आणि राहुल तिवारी हे सतीश शर्मा यांच्या घरी गेले. त्यानंतर तिवारी व शर्मा यांमध्ये वाद निर्माण झाला याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळे घुसून सतीश शर्मा आणि त्यांची मुलगी राधिका हिच्यावर चॉपरने प्राणघातक हल्ला केला, असा आरोप सतीश तिवारी यांच्या मुलाने केला आहे.
या हल्ल्यात सतीश शर्मा यांच्या चेहऱ्यावर तसेच छातीवर तसेच राधिकाच्या चेहऱ्यावर डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर जखमी अवस्थेत बाप-लेक कुटुंबीयांसह शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. त्यांना गंभीर दुखापत झालेली असल्याने पोलिसांनी मेमो देऊन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता पद स्वीकारले