जळगाव - दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी राजकीय चाचपणीला सुरुवात केली आहे. सोमवारी दुपारी खडसे आणि जळगाव महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांची बंद दाराआड भेट झाली. खडसे यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत शहरातील विविध समस्यांसह पालिका बरखास्तीच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या आठवड्यात खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी खडसे समर्थक माजी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेऊन, पालिका बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर खडसे आणि आयुक्तांची भेट झाल्याने चर्चांना उधाण आले आहे. खडसेंनी भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेवर लक्ष केंद्रित केले आहे. सोमवारी दुपारी तीन वाजता पालिका आयुक्त सतीश कुलकर्णी खडसे यांच्या निवासस्थानी दाखल झाले. खडसे यांनी आयुक्तांसोबत सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी व रवींद्र पाटील हेदेखील उपस्थित होते.
पालिकेतील विविध ठेक्यांबाबत झाली चर्चा
आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या ठेक्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये वॉटर ग्रेस व एलईडीच्या ठेक्याबाबत खडसेंनी माहिती जाणून घेतली. आयुक्तांच्या भेटीपूर्वी दुपारी 12 वाजता शहरातील काही नागरिकांनी खडसेंची भेट घेऊन, शहरातील मूलभूत सुविधांबाबत तसेच आयुक्त व सत्ताधाऱ्यांबाबत तक्रार केली होती. याविषयावर देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिकेत नवीन सत्ताकेंद्र ?
महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर एकनाथ खडसे यांनी दोन वर्षांत महापालिकेच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप केला नव्हता. मात्र, खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महापालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात खडसे समर्थक माजी नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतरच या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, खडसे यांच्या रुपाने महापालिकेत नवीन सत्ताकेंद्र निर्माण होत असल्याची चर्चा आहे.