जळगाव - वन्य प्राण्यांची शिकार करून वाहनातून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या दोन शिकाऱ्यांना जामनेर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. ग्रामस्थांनी शिकाऱ्यांना शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. दोन शिकारी अटकेत असून त्यांचे दोन साथीदार पसार होण्यात यशस्वी झाले. याचबरोबर पोलिसांनी 2 मोठ्या रायफल हस्तगत केल्या आहेत.
मेहमूद मोहम्मद आबिद (वय 45) आणि अन्सारी मोहम्मद आबिद (वय 32) दोघे रा. धुळे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांचे साथीदार हर्षद (रा. धुळे) तसेच उस्मान शहा (रा. नाचणखेडा, ता. जामनेर) हे फरार झाले आहेत. हे चौघे जामनेर तालुक्यातील वनविभागात नीलगाय तसेच काळवीटची शिकार करण्यासाठी (एम. एच. ०२ जे. ९७६०) क्रमांकाच्या कारने आले होते.
दरम्यान शिकार केल्यानंतर पळून जात असताना वाडीकिल्ला गावाजवळ जंगलात त्यांची कार रस्त्याच्या कडेला चिखलात फसली होती. त्यांनी गावातील काही तरुणांना मदतीसाठी बोलावले होते. कार चिखलातून बाहेर काढताना मदतीसाठी आलेल्या तरुणांना प्राण्यांच्या मांसाची दुर्गंधी आली. त्यामुळे शिकाऱ्यांचे बिंग फुटले. मात्र, कार चिखलातून बाहेर काढल्यामुळे ते पळून गेले.
गावातील तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र भरधाव वेगामुळे शिकाऱ्यांची कार काही अंतरावर उलटली. त्यामुळे ग्रामस्थांनी दोघांना पकडले. तर अन्य दोघे मात्र, पळून जाण्यात यशस्वी झाले. गाडीतून वन्य प्राण्यांचे मांस, दोन रायफल्स, १२ मोठे जिवंत काडतुसे, दोन खाली केस, २१ लहान काडतुसे व आठ खाली केस असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, सहायक फौजदार जयसिंग राठोड, पोलीस नाईक सचिन पाटील, कॉन्स्टेबल राहूल पाटील, अमोल घुगे, अमोल वंजारी यांच्यासह वनक्षेत्रपाल समाधान पाटील, यांच्या पथकाने ही कारवाई केली.