जळगाव - शेतातून घरी परतत असताना अंगावर वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या तळई गावात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ठरावीक अंतराने या दोन दुर्दैवी घटना घडल्या. मृतांमध्ये तरुणासह प्रौढाचा समावेश आहे. भूषण अनिल पाटील (वय १८) आणि विक्रम दौलत चौधरी (वय ५७) अशी मृतांची नावे असून, दोघेही तळई गावातील रहिवासी होते.
गावावर शोककळा
विक्रम चौधरी व भूषण पाटील हे दोघे जण शेतात गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळई शिवारात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे ते घरी परत येत होते. अंगावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. त्यामुळे तळई गावावर शोककळा पसरली आहे. भूषणच्या अंगावर वीज पडल्यानंतर ग्रामस्थांनी त्याला तत्काळ एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
हेही वाचा - बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी