जळगाव - जिल्ह्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. शनिवारी पहाटे जळगावचे तापमान 10 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. कडाक्याच्या थंडीने जनजीवन प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. पहाटेपासून दुपारी 12 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 5 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत थंडीचा कडाका जाणवत आहे.
हेही वाचा - भारताचे माजी कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे निधन
जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढला आहे. या महिन्याला सुरुवात झाल्यानंतर मध्यंतरी थंडीचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, आता आठवडाभरापासून पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. शनिवारी जळगावातील तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला होता. याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यात तापमान अजून घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
थंडीचा सर्वाधिक त्रास हा सकाळच्या वेळी शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच नोकरदारांना जाणवत आहे. थंडीपासून बचाव व्हावा म्हणून नागरिक स्वेटर, कानटोपी, मफलर अशा कपड्यांचा वापर करत आहेत. थंडीचा ऋतू हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे सकाळी योगा आणि व्यायाम करण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. दरम्यान, थंडीचे प्रमाण वाढलेले असताना पहाटे धुके देखील मोठ्या प्रमाणावर पडत आहे. सकाळी उशिरापर्यंत धुके राहत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर कीडरोगांचा प्रादुर्भाव होत आहे.
हेही वाचा - 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला