जळगाव - कोरोनामुळे राज्य परिवहन मंडळाची बससेवा सध्या बंद आहे. परिणामी सर्व एसटी कर्मचारीही घरीच बसून आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून पगार नसल्याने जळगाव विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी ‘पराठा सेंटर’ सुरू केले आहे. खर्च वगळता दोघींना दिवसाकाठी प्रत्येकी १५० ते २०० रुपये मिळतात. त्यातून त्या आपला घरखर्च चालवत आहेत.
पहिल्या लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बससेवा बंदच आहे. कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील लिपीक राखी शर्मा व राज्यातील पहिली महिला कंडक्टर(वाहक) अशी ओळख असलेल्या रजनी मेघे या दोघींनी बहिणाबाई चौधरी उद्यानाजवळ गेल्या पंधरा दिवसांपासून ‘पराठा सेंटर’ सुरू केले आहे. भांडवल नसल्याने त्यांनी गॅस सिलिंडर, टेबल, खुर्च्यांची घरूनच जुळवाजुळव केली आहे. दिवसाकाठी सुमारे ७०० रुपयांचे पराठे विकले जातात. खर्च वगळता दोघींना प्रत्येकी १५० ते २०० रुपये मिळतात.
आत्मनिर्भर होण्यावर भर -
मेघे या आई व मुलासोबत राहतात. त्यांचे पती इलेक्ट्रिकचे काम करतात. मात्र, सासुबाई आजारी असल्याने त्यांच्या देखरेखीसाठी ते बाहेरगावी असतात. त्यांच्या आजारपणाचा महिन्याला तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. माझाही पगार तीन महिन्यांपासून झालेला नाही. त्यामुळे घरखर्च चालवण्यासाठी छोटेखानी हे पराठा सेंटर सुरू केले, असे कंडक्टर असलेल्या रजनी मेघे यांनी सांगितले.
जगण्यासाठीचा संघर्ष सुरूच -
मी, पती आणि दोन मुली असे चौकोणी कुटुंब आहे. पती फर्निचर तयार करण्याचे काम करतात. लॉकडाऊनमुळे त्यांच्या हाताला काम नाही. तीन महिन्यांपासून माझाही पगार थकला आहे. हातात मोठे भांडवल नाही. त्यामुळे घरातील साहित्य व उसनवारीने घेतलेल्या पैशांवर पराठा सेंटर सुरू केले आहे. यातूनच संकटावर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे राज्य परिवहन मंडळाच्या जळगाव विभागातील लिपीक राखी शर्मा यांनी सांगितले.