जळगाव - गेल्या 4 वर्षांत माझ्या विरोधात षडयंत्र रचून मला विनाकारण छळण्यात आले. माझा पक्षावर रोष नाही. मात्र, माझ्याविरुद्ध षडयंत्र करणारे 4 ते 5 जण आहेत. त्यांची नावे मी पक्षश्रेष्ठींकडे दिली आहे. जर पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर कारवाई केली नाही तर आपण लवकरच पक्षांतर करू, असा निर्वाणीचा इशारा देत माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला अल्टीमेटम दिला आहे. नागपूर, दिल्ली येथून खडसे आज (शुक्रवारी) जळगावात आले होते. त्यांच्या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी पक्षांतराच्या विषयावर आपले मत मांडले.
ते पुढे म्हणाले, माझा पक्षावर अथवा केंद्रीय नेत्यांवर कोणताही रोष नाही. मात्र, पक्षातील काही व्यक्तींवर निश्चित राग आहे. ते पक्षात केवळ षडयंत्र रचत असतात. गेली 4 वर्षे माझ्या विरुद्धही त्यांनी षडयंत्र रचून मला विनाकारण बदनाम केले. माझ्यावर आरोप करणे, चौकशा लावणे, असे प्रकार त्यांनी केले आहेत. या लोकांविरुद्ध मी तक्रार केली आहे. त्यांची नावेही तक्रारीत दिली असून त्यासंबंधी सर्व पुरावेही दिले आहेत. त्यामुळे पक्षाने आता त्यांच्यावर कारवाई करावी, हीच माझी अपेक्षा आहे. ज्यांच्यावर माझा रोष आहे, त्यांच्यासोबत मी काम कसे करणार? पक्षाने संबंधित लोकांवर कारवाई केली नाही तर मी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाईल. माझ्या समर्थकांसह राज्यभरातील कार्यकर्त्यांचा माझ्यावर पक्षांतराचा मोठा दबाव आहे. त्यामुळे मला आता काय तो निर्णय घ्यावाच लागणार आहे, असेही खडसे यावेळी म्हणाले.
हेही वाचा - ...तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते - नारायण राणे
मला डावलण्याचे कारण काय?
ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत, अशा अन्य नेत्यांना पक्षात प्रवेश मिळतो. त्यांना पक्षात महत्त्वाचे स्थान दिले जाते. इतर पक्षातील नेत्यांना पायघड्या टाकल्या जात असताना मला डावलण्याचे कारण काय? असा प्रश्नही खडसेंनी उपस्थित करत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. दरम्यान, पक्षांतर करण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे संकेत खडसेंनी दिले असले तरी ते कोणत्या पक्षात जातील, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे खडसे कोणत्या मार्गाने जातात, या बाबतीत उत्सुकता कायम आहे.