जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार म्हणून भाजपाचे माजीमंत्री एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मात्र, सोमवारी दुपारी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना 'मी भाजपामध्येच आहे', असे सांगत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चेचे खंडन केले.
भुसावळ येथे एकनाथ खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली. त्यावर बोलताना खडसेंनी आपण भाजपातच आहोत, असे उत्तर देत पुढे अधिक बोलणे टाळले.
उदयसिंग पाडवींना मीच सांगितले राष्ट्रवादीत जा -
दरम्यान, यावेळी खडसेंनी एक धक्कादायक माहिती दिली. एकनाथ खडसे यांच्या आदेशानुसार आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असा गौप्यस्फोट नंदुरबार जिल्ह्यातील माजी आमदार तथा पूर्वाश्रमीचे भाजपा नेते उदयसिंग पाडवी यांनी केला होता. रविवारी तळोदा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला होता. खडसे आपल्यासाठी मार्गदर्शक असल्याचेही पाडवी यावेळी म्हणाले होते. या संदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता खडसेंनी, आपणच त्यांना राष्ट्रवादी जाण्यास सांगितले होते. कोणत्या पक्षात जाऊ असे त्यांनी मला विचारले होते, त्यावर आपण त्यांना राष्ट्रवादीत जाण्यास सांगितले होते. पाडवींसारखे अनेक नेते आहेत की ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे, असेही खडसे म्हणाले.